मुंबई -बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर यापुढे अनुत्तीर्ण होण्याचा म्हणजेच नापास होण्याचा शेरा कायमचा पुसला जाणार आहे. यासाठीचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यापूर्वी दहावीच्या विद्यार्थ्यासाठी असा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा -केरळने जिंकली 'कोरोना'ची लढाई; राज्यातील तीनही रुग्णांवरील उपचार यशस्वी!
फेब्रुवारी-मार्च दरम्यान घेण्यात येणारी नियमित परीक्षा आणि जुलै महिन्यात घेण्यात येणारी पुरवणी परीक्षा यासाठी वेगवेगळी सवलत या माध्यमातून देण्यात आली आहे.
शिक्षण विभागाच्या या निर्णयानुसार फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या नियमित परीक्षेत दोन किंवा तीन विषय गेले तर त्यांच्या गुणपत्रिकेवर पुनर्परीक्षेसाठी पात्र असा शेरा मारला जाणार आहे. तर जुलैदरम्यान घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या पुरवणी परीक्षेत तीनपेक्षा अधिक विषयात विद्यार्थी नापास झाले तरी त्यांच्या गुणपत्रिकेवर यापुढे 'कौशल्य विकास कार्यक्रमासाठी पात्र' (Eligible for skill development program) असा शेरा मारला जाणार आहे.
कौशल्य विकास विभागाने यापूर्वी दहावीच्या परीक्षेत तीनहून अधिक विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत प्रशिक्षण देण्याचे आदेश दिले होते, त्याची अंमलबजावणी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने आता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे जे विद्यार्थी फेब्रुवारी-मार्च 2020 च्या नियमित परीक्षेला बसलेले आहेत त्यांच्या गुणपत्रिकेवर यापुढे उत्तीर्ण, पुनर्परीक्षेसाठी पात्र आणि कौशल्य विकास कार्यक्रमासाठी पात्र असे वेगवेगळे शेरे पाहावयास मिळणार आहेत. फेब्रुवारी-मार्च यादरम्यान होत असलेल्या परीक्षेसाठी आणि जुलै महिन्यात होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी काही विषयांमध्ये सूट देण्यात आली आहे. नियमित परीक्षेत श्रेणी विषयासह तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयात एखादा विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्याच्याही गुणपत्रिकेवर पुनर्परीक्षेसाठी पात्र असा शेरा असणार आहे. त्यामुळे त्याला पुन्हा परीक्षेला बसता येणार आहे.
जुलैमध्ये घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेमध्ये शालेय शिक्षण विभागाने खास सूट दिली आहे. या पुरवणी परीक्षेत श्रेणी विषयासह एक किंवा दोन विषयात विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पुनर्परीक्षेसाठी पात्र ठरविले जाणार आहे तर श्रेणी विषयासह तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयात विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला असेल या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर यापुढे 'कौशल्य विकास कार्यक्रमासाठी पात्र' (eligible for skill development program) असा शेरा मारला जाणार आहे.
हेही वाचा -'या' रुग्णालयात चक्क कुत्र करतंय लोकांवर उपचार!