मुंबई - नेहमीच विजेची वाढीव मागणी असलेल्या महाराष्ट्रात पावसाळ्यामुळे घट झाली आहे. राज्यभरात संततधार सुरू असल्याने वीज निर्मितीही घटली असून आज स्वातंत्र्यदिनी (दि. 15 ऑगस्ट) सकाळी दहा वाजता 10 हजार 682 मेगावॉट इतकी अल्प विजेची मागणी नोंदवली गेली आहे.
माहिती देताना प्रसिद्धी अधिकारी, महावितरण कंपनी पावसाळा सुरू झाल्यापासून मागणी घटल्याने दीपनगर वीज निर्मिती केंद्रासह राज्यातील 32 पैकी 17 वीज निर्मिती संच बंद करण्यात आले आहे. त्यामुळे वीज निर्मिती ठप्प आहे. महाजनकोच्या (महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ) वीज निर्मिती केंद्रात तयार होणाऱ्या विजेचे दर जास्त आहेत. त्यामुळे कमी किमतीतील वीज खरेदीवर शासनाचा अधिक भर आहे. विशेष करुन एनटीपीसी (नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन) व खासगी वीज केंद्रातून वीज खरेदी केली जात आहे.
दीपनगर वीज निर्मिती केंद्रातील संच क्रमांक तीन दोन महिन्यांपूर्वीच लोड मॅनेजमेंट सेल व्यवस्थापनाने बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हा संच बंद करण्यात आला. या आधीच संच क्रमांक दोनही बंद आहे. आता संच क्रमांक पाच व चार एमओडीमध्ये असल्याने यातील संच क्रमांक पाच बंद करण्याचे आदेश आहेत. तर संच क्रमांक चार हॅड्रोजन शुद्धतेसाठी बंद करण्यात आला आहे. 1 हजार 420 मेगावॉट क्षमतेच्या दीपनगर वीज केंद्रातील वीज निर्मिती ठप्प आहे. राज्यात पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे एरव्ही 20-22 हजार मेगावॉट वीजेची मागणी असलेल्या राज्याची आजची (शनिवार) मागणी 10 हजार 682 मेगावॉट इतकी आहे.
एनटीपीसीकडून महाराष्ट्र वीज खरेदी करते. त्याचा दर 2.50 पैसे इतका आहे. सध्या ज्या प्रमाणे पेट्रोल पंपावर रोज पेट्रोलचे दर बदलत आहेत. त्याप्रमाणे राज्य व केंद्र वीज नियामक मंडळाकडून वीजेचे दर प्रत्येक महिन्याला बदलत असतात,असे सूत्रांनी सांगितले आहे. सध्या दीपनगरातील वीज निर्मिती बंद असली तरी येथील 500 मेगावॉटच्या दोन्ही संचाचे वीजेचे दर 2.89 पैसे इतके आहेत.
महाजनकोच्या वीज निर्मिती केंद्रातील वीज दर जास्त असल्याचे कारण सांगतांना सूत्रांनी सांगितले की, रेल्वेने कोळसा वाहून आणताना जास्त खर्च येतो. सध्या रेल्वेने कोळसा आणण्यासाठी 1 हजार 700 रुपये प्रती टन या प्रमाणे खर्च येतो. याच्या उलट खासगी वीज केंद्र हे कोळसा खाणींच्या शेजारी असल्याने त्यांची वीज आपल्यापेक्षा कमी किमतीत उपलब्ध होत आहे. सध्या काही खासगी कंपनीचे दर दीड रुपये प्रती युनिट असे आहेत.
सध्या दीपनगरातील वीज निर्मिती थांबली असली तरी महाराष्ट्राची वीजेची मागणी वाढल्यानंतर येथील सर्व वीज निर्मिती संच पूर्ववत कार्यान्वित केले जातील,असे सूत्रांनी सांगितले. सध्या बंद असलेल्या संचाची दुरुस्ती व देखभालीचे काम करण्यात येत आहे.
राज्यात टाळेबंदीमुळे अनेक उद्योग, व्यवसाय व कारखाने बंद असल्याने वीजेची मागणी घटली होती. मात्र, अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या दहा दिवसात देशात विजेची मागणी 2 हजार 700 ते 2 हजार 900 दशलक्ष युनिट इतकी होती. तर दुसऱ्या दहा दिवसात 3 हजार 600 दशलक्ष युनिट इतकी विजेची मागणी पोहोचली. राज्याअंतर्गत रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू झाल्याने ही विजेची मागणी 500 दशलक्ष युनिट इतकी वाढली. देशातील उद्योगांसाठीच्या विजेची मागणी 41.16 टक्के आहे, तर कृषीपंपाची विजेची मागणी 17.69 टक्के आहे. वाणिज्यिक क्षेत्राची विजेची मागणी 8.24 टक्के इतकी आहे. गेल्या वर्षी विजेची कमाल मागणी ही 183 गिगावॉट इतकी पोहचली होती. सध्या देशात वीज निर्मितीची क्षमता 368.69 गिगावॉट इतकी आहे.
महाराष्ट्रात मुंबई वगळता लॉकडाऊनमध्ये 13 हजार मेगावॅट इतकी मागणी होती. तर मागील महिन्यात मुंंबई वगळता राज्यातील विजेचा मागणी सकाळी 18 हजार 107 मेगावॉट तर दुपारी 18 हजार 762 मेगावॉट इतकी पोहोचली होती. मुंबईतील विजेच्या मागणीतही आता वाढ होऊ लागली असून मुंबईतील विजेची मागणी आता 2 हजार 264 मेगावॉट इतकी पोहचली आहे. राज्यात सुरू झालेल्या उद्योग आणि व्यवसायामुळे तसेच उकाड्यामुळे वाढलेली विजेची मागणी पावसाळ्यामुळे घटल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
राज्यातील बंद संच या प्रमाणे
महाजनकोचे (महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ) राज्यात सात वीज निर्मिती केंद्र आहेत. त्यात दीपनगर-भुसावळ, एकलहरे-नाशिक, पारस, परळी, खापरखेडा, कोराडी आणि चंद्रपूर. एकूण 32 संचच्या माध्यमातून वीज निर्मीती होते. त्यापैकी नाशिक-1, कोराडी-3, खापरखेडा-2, पारस-1, परळी-5, चंद्रपूर-1, भुसावळ-4, असे 17 संच बंद आहेत.