मुंबई- मुंबई आणि परिसरात आज सकाळी अचानक वीज पुरवठा खंडित झाला. याचा मोठा आर्थिक परिणाम परिसरातील उद्योग व्यवसायांवर झाला आहे. कोरोनाचे संकट आणि त्यातून थोडे सावरत असतानाच आज वीज पुरवठा खंडित झाल्याचा फटका उद्योगांना बसला आहे. त्यावर या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून उद्योगांचे सुमारे ६०० कोटीहून अधिकचे नुकसान झाले असावे, असा अंदाज महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडले यांनी व्यक्त केला आहे.
दुसरीकडे एस.एम.ई चेंबर ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे यांनी या एकूणच प्रकरणाची तांत्रिक दृष्ट्या चौकशी झाली पाहिजे, आणि पुढे असा प्रकार होणार नाही यासाठी सरकारने एखादे स्वतंत्र पथक नेमावे, अशी मागणी केली आहे. मुळात वीज पुरवठा खंडित होण्याच्या मागे नेमके कोणते कारण असू शकते, याचा अभ्यास होणे आवश्यक आहे. मुंबई आणि परिसरात वीज आणि त्याचे वितरण करणाऱ्या कंपन्यांमध्ये वीज मंडळसोबतच इतर खाजगी कंपन्यांचा समावेश आहे. परंतु, या कंपन्यांमधील समन्वयामध्ये बिघाड होता की काय, याचाही अभ्यास होणे गरजेचे असल्याचे मत मंडले यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर, मुंबईसारख्या ठिकाणी अचानकपणे वीज गायब होणे हे महाराष्ट्राला निश्चितच परवडणारे नाही, असे मतही मंडलेंनी व्यक्त केले.
मुंबईतील बहुतांश उद्योग हे वीज पुरवठ्यावर अवलंबून आहेत. यातच कोरोना काळात मुंबई परिसरात असलेली रुग्णालये आणि या संबंधी असलेल्या विविध औषधांची स्टोअर्स यांनाही वीज खंडित झाल्याने मोठा फटका बसला आहे. त्याचप्रमाणे, मुंबई परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात फूड इंडस्ट्री आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने स्टोरेजमध्ये असलेल्या वस्तूंचे मोठे नुकसान होते. रेफ्रिजेटर आदी विद्युत पुरवठ्यावर चालणाऱ्या वस्तूंना फटका बसतो.