मुंबई- दरवर्षी पावसाळ्यात अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर येतो, अशा इमारती पडून जीवित हानी होते. ही जीवित हानी टाळण्यासाठी पालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्याच्या कालावधीत पालिकेने न्यायालयाच्या आदेशाने अतिधोकादायक 154 इमारतींचे वीज, पाणी कापले आहे. तसेच 148 इमारती जमीनदोस्त केल्या आहेत.
धडक कारवाई
दरवर्षी पावसाळ्यात अतिधोकादायक इमारती कोसळून त्यात अनेक जण जखमी होतात. तर काही जणांचा मृत्यू होतो. मुंबईत अशा 407 अतिधोकादायक इमारती उभ्या आहेत. या इमारती कोसळून यंदाच्या पावसाळ्यात जिवीतहानी होऊ नये, यासाठी महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्व 24 प्रशासकीय विभागातील धोकादायक इमारती, महापालिका क्षेत्रातील डोंगर उतारावरील वस्त्यांबाबत आढावा घेऊन आवश्यकतेनुसार आपत्कालीन व्यवस्थापन कायदा-2005 नियमांनुसार अतिक्रमणांच्या आस्थापनांवर कार्यवाही तातडीने करण्याबाबतचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
अशी झाली कारवाई
मुंबईत 407 इमारती अतिधोकादायक असून यापैकी 98 इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. 154 इमारतींचे पाणी व वीज कनेक्शन कापण्यात आले आहे. 21 अतिधोकादायक इमारतींवर तोडक कारवाई करण्याची प्रक्रिया करण्यापूर्वी तांत्रिक सल्लागार समितीचा सल्ला घेतला जाणार आहे. 53 अतिधोकादायक इमारतींचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहेत. तर 81 इमारती तांत्रिक कारणामुळे रिकाम्या करण्यात आल्या नसून या इमारतीतील वीज व पाणी कनेक्शन अद्याप तोडण्यात आलेले नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले.
धोकादायक इमारती कुठल्या
मुंबईत 407 इमारती अतिधोकादायक आहेत. त्यात मुंबई महापालिकेच्या मालकीच्या 58, सरकारी मालकीच्या 27 तर खासगी 322 इमारती आहेत. खासगी इमारतीमधील अनेक इमारती या विकासकाकडून नवीन इमारती बांधून मिळतील की नाही या भीतीने रहिवासी खाली करत नाहीत. यामुळे अशा धोकादायक इमारतींमध्ये नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन रहावे लागते.