मुंबई-इंधनाच्या वाढत्या किंमती पाहता इलेक्ट्रिक दुचाकीकडे नागरिकांचा कल वाढताना दिसत आहे. पेट्रोलचे दर हे शंभरीवर पोहोचले आहे त्यामुळे सर्वसामान्यांना पेट्रोलवर चालणारी वाहने चालवणे अवघड झाले आहे. याला पर्याय म्हणून आता इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहक वळत आहेत. काही दिवसांत इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना मोठी मागणी मिळताना दिसून येत आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत' विशेष आढावा...
पेट्रोल, डिझेल दरवाढ काही कमी होताना दिसत नाही. यामुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे आर्थिक गणितही कोलमडत चालले आहे. या इंधन दरवाढीला वैतागलेले दुचाकीस्वार आता विजेवर चालणार्या (इलेक्ट्रिक) वाहनाला पसंती देत आहेत. पेट्रोल दरवाढीचा चढता आलेख कमी न झाल्यास इलेक्ट्रिक दुचाकीच्या खरेदीत आणखी वाढ होणार आहे. पेट्रोलचा लिटरचा दर शंभर रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचला असून डिझेल नव्वदीच्या घरात आहे. त्यामुळे खर्च वाढला आहे. यामुळे इंधन खर्चही वाढला आहे. यामुळे ग्राहक विद्यूत वाहनाकडे वळत असल्याचे इलेक्ट्रिक दुचाकी विक्रेते विनय कांबळी यांनी सांगितले.
विजेवर चालणार्या दुचाकीचे अनेक फायदे
विजेवर चालणार्या दुचाकीचे अनेक फायदे आहेत. वाहन विजेवर चालत असल्यामुळे पेट्रोल भरण्यासाठी रांगा लावण्याची गरज या वाहनांना लागत नाही. शिवाय पेट्रोलच्या तुलनेत विजेवर होणारा खर्च कमी आहे. त्यामुळे साहजिकच पैशाची बचत होते. देखभाल व दुरुस्ती खर्चही अत्यल्प आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक दुचाकी खरेदीचे प्रमाण वाढले आहे. शिवाय, पेट्रोलची दरवाढ कधी थांबणार का ? दुचाकीप्रमाणेच चारचाकी, माल व प्रवासी वाहतूक करणार्या इतर इलेक्ट्रिक वाहनांही ग्राहकांची पसंती वाढत असल्याचे कांबळी यांनी सांगितले.