मुंबई - " मी आत्तापर्यंत कधीच तुरूंगात गेलो नाही, हे सरकार मला जेलमध्ये टाकणार असेल तर त्याचा मला आनंदच होईल. हे वक्तव्य आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे. त्यांचे हेच वक्तव्य त्यांच्या विरोधात ईडीने कारवाई करण्यास कारणीभूत ठरल्याचे आता राजकीय वर्तुळात सांगितले जात आहे. याआधी ईडीनेच छगन भुजबळ, राज ठाकरे काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना हैराण केले आहे. तीच रणनिती आता पवारांविरोधात वापरली जात आहे का? असे प्रश्न राजकीय वर्तुळात जोरदारपणे चर्चीले जात आहे.
हेही वाचा - पवारांना ईडीची नोटीस; संतापलेल्या राष्ट्रवादीकडून आज बारामती बंद, पुण्यात निदर्शने करणार
भाजपचे केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यानंतर या सरकारवर विरोधकांना आणि स्वाय्यत संस्थांना संपवण्याचा आरोप होतो. ईडी सीबीआयचा वापर विरोधकांवर आकसाने केला जातोय. ईडीची भिती दाखवून विरोधकांना भाजपमध्ये घेतल्याची अनेक उदाहरणे दिसतात. त्यातूनच हे आरोप होत आहेत. त्यात आता थेट शरद पवारांवर ईडी अस्र उगारले गेले आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनीही भाजपची पोलखोल केली होती. त्यानंतर त्यांच्या मागे ईडीची पिडा लावण्यात आली. अर्थ व्यवस्थेवरूनही काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारच्या नाकी दम आणला होता. तेही सध्या तुरूंगात आहेत. अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यातूनच पवारांना लक्ष्य केले जात नाही ना अशी शंका राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. कारवाई करायची होती तर गेली पाच वर्षात कोणतीच कारवाई का करण्यात आली नाही ? निवडणूकीच्या तोंडावरच अशी कारवाई करण्याचे नक्की कारण काय ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
विरोधकांना संपवण्याचा डाव ?
राज्यात काँग्रेसची ताकद कमी झाली आहे. काँग्रेसमध्ये लढा देईल असा एकही नेता सध्या तरी राज्यात नाही. शरद पवार या वयातही भाजपला टक्कर देत आहे. त्यामुळे मुळावरच घाव घातला तर झाड पडेल, या रणनितीनुसार ही कारवाई केली गेल्याची शंका राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपने एकापाठोपाठ धक्के दिले. मातब्बर नेते पवारांना सोडून गेले. शरद पवारांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजपने पूर्ण ताकदीने केला. पण, नमतील ते शरद पवार कसले. त्यांनी तेवढ्या जिद्दीने आणि ताकदीने मैदानात उडी घेतली. एखाद्या चवताळलेल्या वाघाप्रमाणे त्यांनी भाजपवर तुटून पडले. एवढ्यावर ते थांबले नाहीत. गेले त्यांचा विचार न करता तरुणांना त्यांनी आपलेसे केलं. त्यांचे गेल्या आठवड्यात राज्यात झालेले झंझावाती दौरे आणि त्याला मिळालेला प्रतिसाद पाहता हेच तर त्यांच्यावरील कारवाईचे निमित्त ठरले नसावे ना अशी जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
खरोखरच भाजपला भिती वाटते का?
राष्ट्रवादीचे एकापेक्षा एक शिलेदार भाजपने आपल्या गळाला लावले. त्यातून राष्ट्रवादी आणि पवार नामोहरम होतील अशी भाजपची रणनिती होती. मात्र, त्यातूनही पवारांनी जोरदार मुसंडी मारल्याचं दिसून येत आहे. पायाला भिंगरी लावून त्यांनी राज्याचा दौरा केला. वयाच्या ८० वर्षातील त्यांचा हा उत्साह तरूणालाही लाजवणार आहे. त्यांनी एकामागून एक सभा घेत भाजपलाच दणके द्यायला सुरूवात केली. कार्यकर्त्यांत विशेषता: तरूणात उत्साह निर्माण केला. राष्ट्रवादीमध्ये चैतन्य निर्माण केले.