महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उपसभापती निवडणूकः भाजप-शिवसेनेविरोधात काँग्रेस आघाडीचे पारडे जड

विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि सत्ताधारी भाजप-शिवसेना युती यांच्यात चुरशीची लढत होण्याचे संकेत आहेत.

विधान भवन

By

Published : Feb 26, 2019, 9:19 PM IST


मुंबई- विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि सत्ताधारी भाजप-शिवसेना युती यांच्यात चुरशीची लढत होण्याचे संकेत आहेत. या लढाईत सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीचे पारडे जड आहे. ही निवडणूक भाजप-शिवसेना युतीसाठी प्रतिष्ठेची असल्याने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. तर काँग्रेस-राष्ट्रवादीने युतीच्या उमेदवाराच्या पराभवासाठी जोरदार तयारी चालवली आहे.


विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यापासून उपसभापतीपद रिक्त आहे. या पदासाठी या अधिवेशनात निवडणूक होण्याची शक्यता आहे. आजवर भाजप आणि शिवसेनेच्या युतीबाबत तळ्यात मळ्यात सुरू असल्याने या दोन्ही पक्षांना उमेदवार उभा केल्यास विजयाची खात्री वाटत नव्हती. त्यामुळे आजवर सत्ताधाऱ्यांनी ही निवडणूक टाळण्याचीच भूमिका घेतली होती. युतीनंतर शिवसेनेच्या नीलम गोऱहे यांना उपसभापतीची उमेदवारी देत रिंगणात उतरविण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी सुरू केली आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीने या लढाईत स्वतःच्या आमदाराला उतरविण्यापेक्षा अपक्ष आमदार श्रीकांत देशपांडे यांना रिंगणात उतरविण्याचे ठरवले आहे.


संख्याबळ विरोधकांच्या बाजूने -
विधान परिषदेचे संख्याबळ विरोधकांच्या बाजुने झुकलेले आहे. विधान परिषदेची सदस्य संख्या ७८ असून माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर एक जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे ७७ मतदार या निवडणुकीत भाग घेऊ शकतात. दोन्ही बाजूला समसमान मते पडली तरच सभापतींना मतदानाचा अधिकार असतो. अन्यथा ते मतदान करत नाहीत. त्यामुळे सुरूवातीला केवळ ७६ मतदार मतदान करू शकतील.


राष्ट्रवादीचे १६ तर काँग्रेसचे १६ असे एकून ३२ मते आहेत. त्याशिवाय कपिल पाटील, जोगेंद्र कवाडे, शेकापचे जयंत पाटील यांची आणि या श्रीकांत देशपांडे, दत्तात्रय सावंत आणि बाळाराम पाटील असे ३ अपक्ष आमदारांची बेरीज केल्यावर ३८ मते काँग्रेस-राष्ट्रवादीच्याजवळ आहेत. याउलट भाजपचे २२, शिवसेनेचे १२ असे ३४ मते आहेत. यासोबतच महादेव जानकर, नागो गाणार, किशोर दराडे यांची मते जोडल्यास एकून ३७ मते सत्ताधा-यांकडे आहेत. प्रशांत परिचारक हे सुद्धा सत्ताधारी आघाडीतील असले तरी ते सध्या निलंबित असल्याने मतदान करू शकणार नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादीकडे ३८ तर भाजप-शिवसेनेकडे ३७ मते असल्याने काँग्रेस आघाडी समर्थीत उमेदवाराच्या विजयाची शक्यता अधिक आहे.

मते फोडण्याची होणार 'रणनीती' -
शिवसेनेसोबत युती झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत पराभव झाल्यास राज्यभर चुकीचा संदेश जाईल, हे लक्षात घेऊन काँग्रेस आघाडीतील मतांना सुरूंग लावण्याची रणनीती भाजपने आखली आहे. राष्ट्रवादीचे अरूण काका जगताप यांचा मुलगा संग्राम जगताप यांना भाजपकडून अहमदनगर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीचे देण्याची चर्चा असल्याने जगताप हे मतदानाला गैरहजर राहून भाजपला अप्रत्यक्ष मदत करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय राष्ट्रवादीचेच अनिल भोसले यांच्या पत्नी भाजपच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडणून आले आहेत. त्यामुळे ते ही मतदानाकडे पाठ फिरवू शकतात. हे दोन मते कमी झाल्यास काँग्रेस आघाडीचे संख्याबळ ३८ वरून ३६ वर येईल.


पवार 'पावर' ठरणार महत्वाची -
काँग्रेसचे आमदार चंद्रकांत रघूवंशी हे सध्या आयसीयूत दाखल असल्याने, ते मतदानाला हजर राहण्याची शक्यता कमी आहे. पर्यायाने काँग्रेस आघाडीचे संख्याबळ ३५ होऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशपांडे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला असल्याने निवडणुकीच्या राजकीय व्यवस्थापनावर ते स्वतः लक्ष ठेवणार आहेत. पवारांनी जगताप आणि भोसले यांना आपला 'पावर' दाखवल्यास ते मतदानाला हजर राहू शकतात. अशा स्थितीत काँग्रेस आघाडी समर्थित उमेदवाराला ३७ आणि भाजप-शिवसेनेच्या उमेदवाराला ३७ अशी मते मिळू शकतात.

सभापतीचे मत निर्यणायक ठरणार?
दोन्ही उमेदवाराला सारखीच मते मिळाल्याने सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे मतदान करू शकतात आणि ते स्वतः राष्ट्रवादीचे आमदार असल्याने श्रीकांत देशपांडे यांचा विजय होऊ शकतो. त्यामुळेच शिवसेनेच्या नीलम गो-हे यांच्याविरूद्ध विरोधकांनी उमेदवार उभा करू नये, असा प्रयत्न भाजपने चालवला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभापतींची भेट घेऊन चर्चा केल्याचे कळते.

ABOUT THE AUTHOR

...view details