मुंबई: लोकसभा निवडणूकीच्या तयारीसाठी करण्यात मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षण बैठकीला राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामध्ये मनसे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांसह राष्ट्रीय स्तरावरील आप, बहुजन समाज पार्टी, भारतीय जनता पार्टी, इंडियन नॅशनल काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या पक्षांच्या नेत्यांचा समावेश असणार आहे. या पक्षांच्या प्रतिनिधिंकडून मतदार याद्यांमधील सुधारणेबाबत या बैठकीत सूचना स्विकारल्या जातील, अशी माहिती राज्याचे सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी दिली.
निवडणूकांच्या घोषणेपूर्वी कार्यक्रम: देशात लोकसभेची निवडणूक ( lok sabha elections ) घोषित होण्यापूर्वी आयोगाने तयारी सुरु केली आहे. देशपातळीवर मतदार याद्यां अंतिम करण्यावर भर दिला आहे. सद्या घरोघरी जाऊन मतदारांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. त्यामध्ये घरातील मतदारांची संख्या किंवा इतर ठिकाणी रहाण्यास गेलेल्या कुटुंबातील व्यक्तीचे नाव वगळणे अशा सुधारणा केल्या जात आहेत. मतदार याद्यांच्या पुर्ननिरीक्षणाचा कार्यक्रम झाल्यानंतर २२ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण केले जाणार असल्याचे पारकर यांनी सांगितले.