मुंबई Eknath Shinde On Online Transfer : राज्य परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक आणि सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या आता ऑनलाईन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. बुधवारी सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कळ दाबून बदलीपात्र अधिकाऱ्यांची संगणकीय यादी जाहीर करण्यात आली. या यंत्रणेच्या माध्यमातून पूर्णत: पारदर्शकपणे आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय बदल्यांची कार्यवाही होईल, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
- मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्यांची अंतिम यादी :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 166 मोटार वाहन निरीक्षक आणि 314 सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदलीची अंतिम यादी तयार करण्यात आली. 166 मोटार वाहन निरीक्षकांपैकी 91 टक्के तर 314 सहायक मोटार वाहन निरीक्षकांपैकी 97 टक्के बदल्या पसंती क्रमानुसार करण्यात आल्या आहेत.
पारदर्शक बदल्यांसाठी ऑनलाईन प्रणाली विकसित:परिवहन विभागातील बदल्या प्रसार माध्यमांमध्ये आणि विधीमंडळाच्या अधिवेशनांमध्ये चर्चेत राहत होत्या. त्यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पारदर्शकपणे बदल्या करण्यासाठी संगणीकृत करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विभागानं ही प्रणाली विकसीत केली. त्याचं सादरीकरण विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी बैठकीत केलं.