मुंबई -मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यात मराठा क्रांती मोर्चा आंदोलने झाली. दरम्यान ज्या ४० हून अधिक कार्यकर्त्यांनी बलिदान दिले त्यांचे बलिदान वाया जाऊ दिले जाणार नाही. त्यांच्या कुटुंबीयांना मदत आणि नोकरीसाठी मुख्यमंत्र्यांना मी विनंती करणार असून त्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज(गुरुवार) सांगितले.
मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्या संदर्भात आज शिंदे यांच्या दालनात एक बैठक झाली. त्यानंतर त्यांनी हे आश्वासन दिले. या बैठकीला शिव संग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे, मराठा मोर्चा समन्वयक रमेश केरे आणि मराठा समाजातील इतर पदाधिकारी, आरक्षण चळवळीसाठी बलिदान दिलेल्या कार्यकर्त्यांचे नातेवाईक होते. नगरविकास मंत्री शिंदे म्हणाले, मागील सरकारने मदत आणि नोकरीबाबत जे आश्वासन दिलं होतं, त्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. सरकार या समाजाला पूर्णपणे न्याय देईल. सर्वोच्च न्यायालयात आरक्षण केस सुरू आहे. राज्य सरकारने आरक्षण कायद्याच्या चौकटीत राहून दिलं आहे. त्याला उच्च न्यायालयाने वैध ठरवले आहे. ते सर्वोच्च न्यायालयातदेखील ग्राह्य राहील, यासाठी आवश्यक ते सर्व सरकार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.