मुंबई -भाजपने आज राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली असून यात विधानसभा निवडणुकीत दूर ठेवण्यात आलेल्यांनाही संधी देण्यात आली. दुसरीकडे मागील काही वर्षांपासून नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मात्र डावलण्यात आले आहे. त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत संधी मिळेल, असे बोलले जात होते. यातही डावलले गेल्याने यापुढे भाजपचे दरवाजे हे खडसे यांच्यासाठी बंद झाले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
भाजपच्या नवीन कार्यकारिणीत विधानसभा निवडणुकीत तिकीटही नाकारण्यात आलेले व माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे, तर या निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे, राम शिंदे यांना संधी देण्यात आली आहे. हे तीनही नेते तरुण असल्याने त्यांना ही संधी दिली असल्याचे सांगण्यात येते. तर खडसे यांचे वय झाले असल्याने त्यांना डावलण्यात आले असावे असेही बोलले जात आहे.
खडसे हे मागील काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यात खडसे यांचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील विधाने करणे सुरूच असल्याने त्यांना या कार्यकारिणीत घेऊन संधी देण्यापेक्षा भाजपने दुर्लक्ष करत त्यांना भाजपचे दरवाजे बंद केले आहेत. विधानसभा निवडणुकीत खडसे यांना बाजूला ठेवण्यासाठी भाजपने त्यांच्या मुलीला संधी दिली तर खासदारकीसाठी सुनेला निवडले होते. त्यातही मुलीचा पराभव झाल्यानंतर खडसे यांना विधानपरिषदेवर घेतले जाईल, अशी चर्चा सुरू असतानाच त्यांना तिथेही डावलेले गेले. यामुळे मागील काही दिवसांत खडसे यांची यामुळे नाराजी उफाळून आली होती.