मुंबई - मृदा व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्याकडे कृषी विभागाच्या सचिव पदाचा पूर्णवेळ पदभार देण्यात आला आहे. त्यांच्याकडे मृदा व जलसंधारण विभागाचीही तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे. निम्मा महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना या विभागाला पूर्णवेळ अधिकारी नव्हता. मात्र, आता ती प्रतीक्षा संपलेली आहे.
कृषी खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विजयकुमार ३१ ऑगस्ट २०१८ ला सेवानिवृत्त झाले. त्यानंतर सप्टेंबरपासून कृषी खात्याचा अतिरिक्त कार्यभार जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्याकडे दिला आहे. फडणवीस यांनी गेल्या ९ महिन्यात अनेक विभागातील सचिवांच्या बदल्या केल्या. मात्र, कृषी खात्यासाठी पूर्णवेळ सचिव देणे त्यांना जमले नाही.
डवले १९९७ च्या सालचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांच्याकडे मृदा व जलसंधारण आणि रोजगार हमी योजना विभागाचाही पूर्णवेळ कार्यभार होता. आता त्यांच्याकडील हा पूर्णवेळ पदभार काढून कृषी विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच मृदा व जलसंधारण विभागाचा त्यांच्याकडे तात्पुरता पदभार सोपविण्यात आला आहे.
डवले यांचा कृषी क्षेत्रातील अभ्यास आणि कार्यशैली यामुळे त्यांच्याकडे कृषी विभागाच्या सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांनी यापूर्वी नाशिकचे विभागीय आयुक्त म्हणूनही उत्कृष्ट काम पाहिले आहे. शासनाच्या ‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीही त्यांचा मोठा वाटा आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यात तत्कालीन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन झाल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी खाते स्वतःकडे ठेवले होते. त्यानंतर कृषी खात्याचा अतिरिक्त कार्यभार महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आला. पाटील यांच्याकडे महसूल, मदत पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम, अशी खाती आहेत. अशातच ते गेले वर्षभर मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन तसेच दुष्काळी उपाययोजनांमध्ये अडकल्याने कृषी खात्याकडे लक्ष देताना त्यांची दमछाक होत आहे.
दुष्काळ निवारणाबरोबरच खरीप नियोजनाचे मोठे आव्हान असल्याने पूर्णवेळ कृषी सचिवाच्या नियुक्तीनंतर आता पूर्णवेळ कृषीमंत्र्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.