मुंबई - कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला याला मुंबई पोलिसांच्या खंडणी पथकाने अटक केल्यानंतर लकडावालाच्या मुंबईतील खंडणी वसुली करणाऱ्या हस्तकांचे नेटवर्क एकामागून एक उध्वस्त करण्यास मुंबई पोलिसांनी सुरुवात केली आहे. या आगोदर लकडावाला ह्याचे खास हस्तक म्हणून ओळखले जाणारे सलीम महाराज व तारिक परवीन या दोघांना अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने नदीम लकडावाला याला अटक केली आहे.
नदीम लकडावाला हा एजाज लकडावाला याचा आतेभाऊ असून गेल्या बऱ्याच वर्षापासून तो मुंबईतील बड्या उद्योजकांची माहिती एजाज लकडावाला याला पोहचवत होता. एजाज लकडावाला याला माहिती पुरविल्यानंतर नदीम हा स्वतः दुबईला जाऊन एजाज लकडावाला व पीडित व्यक्तीशी फोनवर संवाद साधून देऊन खंडणीसाठी मध्यस्थीची भूमिका पार पाडत होता. खंडणीमधून मिळालेला पैसा हा नदीम हवालामार्फत दुबईला पाठवून पुन्हा मुंबईत हवालामार्फत आणून इथल्या व्यवसायात गुंतवत होता. नदीम लकडावाला हा एजाज लकडावालाच्या टोळीत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुंडांना सामिल करण्याचे काम करत होता. मात्र, आजपर्यंत कोणालाही याबद्दल माहिती मिळत नव्हती. कारण मुंबईतील खार परिसरात राहणाऱ्या नदीम लकडावला याने त्याची ओळख एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून समोर आणली होती.