मुंबई -गेले नऊ महिने कोरोना विषाणूशी युद्ध सुरु आहे. कोरोना विषाणूचा प्रसार काही प्रमाणात कमी झाला असताना ब्रिटनमधून कोरोनाचा नवा स्ट्रेन समोर आला आहे. राज्यात या नव्या कोरोना स्ट्रेंनचे ८ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यामुळे कोरोनानंतर नव्या स्ट्रेनचाही राज्यात शिरकाव झाला आहे.
राज्यात ८ रुग्ण पॉझिटिव्ह -
मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू आहे. राज्यात आतापर्यंत १९,३५,६३६ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ४९,५८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात ५२,०८४ सक्रिय रुग्ण असून १८,३२,८२५ कोरोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६९ टक्के एवढे आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादृर्भाव कमी होत असताना ब्रिटन येथे कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने २३ डिसेंबरपासून भारतात येणारी विमानसेवा बंद केली आहे. २५ नोव्हेंबरपासून ब्रिटन युके येथून आलेल्या प्रवाशांचा शोध घेऊन चाचणी केली जात आहे. त्यापैकी राज्यातील ८ जणांना नव्या कोरोची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यापैकी मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदरमधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.