मुंबई - पाऊस सुरू झाल्याने वन्यजीव भरकटून मानवी वस्तीकडे जाण्याचे प्रकार घडतात. कांजूरमार्गमध्ये आठ फुटी अजगर तर, मुलुंडमध्ये एक फूट लांबीचा अजगर व एक तस्कर जातीचा साप सापडला आहे. त्यांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.
कांजूरमार्ग एल.बी.एस. मार्ग येथे अवंती कन्स्ट्रक्शन साईटच्या जवळ एक महाकाय अजगर आढळला. प्लँट अॅण्ड अॅनिमल वेल्फेयर सोसायटी व अम्मा केअर फाउंडेशनचे स्वयंसेवक हसमुख वळंजू यांना याबाबत संतोष बावकर यांनी माहिती दिली. त्यानंतर वळंजू मध्यरात्री अडीच वाजता हा आठ फुटी अजगर पकडला. त्यानंतर अजगराची सुटका करून त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले, अशी माहिती पॉज-मुंबई एसीएफचे संस्थापक सुनीष सुब्रमण्यम यांनी दिली.
तर, सकाळी साडेसहाच्या सुमारास मुलुंड येथील रमेश चव्हाण यांच्या घरावरील एक फुटी अजगर आणि मुलुंड पश्चिमच्या अमर नगर येथील एका घरावर तस्कर प्रजातीचा साप दिसला. स्थानिक रहिवाशी विशाल सुरडकर यांनी याबाबात माहिती दिली. त्यानंतर त्या एक फुटी अजगराला व तस्कर सापाला पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले.