श्रीनगर : देशभरात आज ईद उल फित्र मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यात येत आहे. काश्मीर खोऱ्यातील मुस्लीम बांधवही मोठ्या उत्साहात ईद उल फित्र साजरी करत आहेत. काश्मीर खोऱ्यातील लहान मोठ्या मशीदीसह इदगाह मैदानावरही मोठ्या संख्येने नागरिक ईद उल फित्र साजरी करत आहोत. त्यासह देशाच्या आर्थिक राजधानीतही मोठ्या प्रमाणात ईद उल फित्र साजरी करण्यात येत आहे. सकाळपासूनच मुस्लीम बांधव मुंबईतील विविध मशीदीत ईदचा नमाज अदा करत आहेत.
काश्मीरच्या खोऱ्यात शांतता नांदण्यासाठी प्रार्थना :काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात मुस्लीम बांधव राहतात. त्यांनी सकाळीच ईद उल फित्रनिमित्त मशीदीत नमाज अदा केला. यावेळी काश्मीर खोऱ्यात शांतता नांदावी यासाठी मुस्लीम बांधवांकडून अल्लाहकडे प्रार्थना करण्यात आली. श्रीनगरच्या मुख्य जामा मशीदीतही ईदचा नमाज अदा करण्यात आला असून यावेळी मोठ्या संख्येने मुस्लीम बांधवांची उपस्थिती होती.
काश्मीर खोऱ्यात सुरू आहे उत्साह :काश्मीर खोऱ्यातील लहान मोठ्या मशीदीत सकाळपासून ईद उल फित्रचा उत्साह आहे. काश्मीर खोरे सकाळपासून अल्लाहू अकबरच्या नादांनी दुमदुमले आहे. काश्मीर खोऱ्यातील अतहर शरीफ दर्गाह हजरत बिल श्रीनगर येथे नमाज आयोजित करण्यात आला आहे. जम्मू परिसरातील सर्वात मोठ्या जामा मशीदमध्येही नमाजचा मोठा उत्साह आहे. दर्गा हजरत बिल येथे सकाळी 10 वाजता ईद उल फित्रची नमाज अदा करण्यात येणार आहे.