मुंबई-राज्य सरकारनं ईद ए मिलादची सुट्टी शुक्रवारी जाहीर केली आहे. ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शुक्रवारी शासकीय सुट्टी जाहीर करण्याची विनंती केली होती. राज्यात शांततेचे वातावरण असावे आणि गर्दी तसेच मिरवणुकांचे नियोजन करता यावे, यासाठी २९ तारखेला सुट्टी देण्याची विनंती त्यांनी केली होती. शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळे, आमदार अबू आझमी, आमदार रईस खान, नसीम खान, आदींचा समावेश होता.
विसर्जन मिरवणुकीतही शिस्त पाळावी-राज्याच्या विविध भागात अनंत चतुर्दशीनिमित्त मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन मिरवणुका काढण्यात येतात. तसेच मुस्लीम बांधवांकडून ईद ए मिलादनिमित्त मिरवणुका काढण्यात येत असतात. दोन्ही सणांमुळे एकाच दिवशी रस्त्यांवर गर्दी होणार असल्यानं पोलिसांची दमछाक होण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणांवर ताण टाळण्याकरिता २९ सप्टेंबरची सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणरायाला आपण सर्वजण अनंत चतुर्दशीनिला मनोभावे निरोप देणार आहोत. नेहमीप्रमाणे विसर्जन मिरवणुकीतही शिस्त पाळावी. शांतता, सद्भावनेच्या वातावरणात गणेश विसर्जन पार पाडावं, असे मुख्यमंत्र्यांनी गणेशभक्तांना आवाहन केले आहे.
गेले दहा दिवस श्री गणेशाच्या आगमनाने मांगल्याचे वातावरण निर्माण झाले. येणाऱ्या काळातही ईद तसेच नवरात्री, दसरा –दिवाळीसारखे सण आहेत. सर्वांनी एकोप्याने आणि भक्तिभावाने हे सण पार पाडावे आणि राज्याची परंपरा अधिक उज्वल करावी-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे