मुंबई- अकरावी प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आली आहे. 28 मे, 2021 चा यासंदर्भातला अध्यादेश न्यायालयाने रद्द करत अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांनुसारच करावेत, असे न्यायालयाने सांगितले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही अभ्यास करु, सध्या निकालपत्र आम्हाला मिळालेले नाही. त्यामुळे यावर बोलणे योग्य होणार नाही. मात्र, विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशासाठी लवकरात लवकर आम्ही प्रयत्न करणार आहे. येत्या काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होणार याची आम्ही पुरेपूर काळजी घेणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
विद्यार्थ्यांची वाढली अडचण
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीची परीक्षा रद्द केली आहे. तसेच अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीच्या विद्यार्थ्यांना निकाल जाहीर करण्यात आलेला होता. यामुळे अकरावी प्रवेशाबाबद विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झालेला होता. मात्र, अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय सरकारने घेतला. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यांत आले होते. मंगळवारी (दि. 10 ऑगस्ट) उच्च न्यायालयाने अकरावी प्रवेशासाठीची घेण्यात येणारी सीईटी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तसेच 28 मे, 2021 चा यासंदर्भातला अध्यादेश न्यायालयाने रद्द करत अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांनुसारच करावेत, असे न्यायालयाने सांगितले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सीईटी परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी अडचणीत सापडलेले आहे. उच्च न्यायालयाचे निर्णयावर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही बोलण्याचे टाळले आहे. आम्ही न्यायालयाचा निकालाचा अभ्यास करू, असे वर्षा गायकवाड यांच्याकडून सांगण्यात आले आहे.