मुंबई- वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द करण्याचा महत्त्वापूर्ण निर्णय केंद्र सरकारने आज (दि. 1 जून) घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांबाबत ही विद्यार्थ्यांचे आरोग्य व हित लक्षात घेऊन लवकरच निर्णय घेण्याची माहिती दिली आहेत.
विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षा ही प्राथमिकता
कोरोनाची सध्याची परिस्थिती व आजारांचा मुलांवर होणारा प्रार्दुभाव, परीक्षेच्या संभ्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात वाढलेला तणाव विचारात घेता परीक्षेऐवजी पर्यायी व्यवस्थेचा विचार करावा. तसेच केंद्र सरकारने देश पातळीवर या संदर्भात एकसुत्री धोरण निश्चित करावे, ही मागणी महाराष्ट्र शासनाने केली होती. या मागण्यांचा विचार करता केंद्र सरकारने सीबीएसची बारावीची परीक्षा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा निश्चितच स्वागतार्ह आहे. आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो. मुलांच्या शैक्षणिक जीवनातील बारावीची परीक्षा ही महत्त्वाची पायरी असली तरीही सध्याची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षा ही आपल्या सर्वांची प्राथमिकता असली पाहिजे. यापुढे महाराष्ट्र शासनही महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांबाबत ही विद्यार्थ्यांचे आरोग्य व हित जोपासून लवकरच निर्णय घेईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.