मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देण्याचे कारण स्पष्ट केले. आपल्यामुळे शरद पवारांना या वयात त्रास होऊ नये, त्यांचे नाव विनाकारण गोवले जात असल्याने आपण अस्वस्थ झालो होतो, त्यामुळे राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या वक्तव्यावर शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी टीका केली आहे.
हेही वाचा -...अन् अजित पवारांना रडू कोसळले, म्हणाले आम्हालाही भावना असतात
अजित पवारांचे भावनिक नाट्य खरे वाटत असले, तरी ठेवीदारांच्या पैशांवर कुणी डल्ला मारला, असा प्रश्न उपस्थित करणारे ट्विट त्यांनी केले आहे. कवितेच्या भाषेत ट्विट करत त्यांनी म्हटले आहे की, "मी त्यांचा पुतण्या म्हणून काकांचे आले नाव? म्हणून..माझ्या लेकरांना सांगतोय, गड्या शेती..बरा आपला गाव, भावूक बापाचा पोराला सल्ला! हे सगळे खरे वाटले तरीही एक सवाल उरला, ठेवीदारांच्या पैशावर मग नेमका कुणी मारला डल्ला? ज्यांचे पैसे बुडाले त्या सामान्य माणसालापण द्या की असाच एखादा सल्ला!"
हेही वाचा -या वयात पवारांना बदनामी सहन करावी लागते, हे पटलं नाही - अजित पवार
२५ हजार कोटींचा गैरव्यवहार झाला असेल तर अनेक चौकशांना आम्ही सामोरे जात आहोत. त्यातील काही चौकशा पूर्ण व्हायच्या आहेत. तोवरच न्यायालयाने गुन्हे दाखल केले. मात्र पवारसाहेबांच्या नावाचा कुठेही सहभाग नसतानाही त्यांचे नाव कशाला गोवले. पवार साहेबांमुळे इथेपर्यंत पोहोचलो, मग केवळ माझ्या नावामुळे पवार साहेबांचे नाव माध्यमात येऊ लागले म्हणून मी अस्वस्थ झालो. त्यामुळे मी राजीनामा देण्याचा विचार केला, असे अजित पवार पत्रकार परिषदेत म्हणाले होते.