मुंबई - उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब केल्यानंतर आता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत ही हे आरक्षण लागू झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या आरक्षणासाठी अर्ज दाखल करावेत असे आवाहन शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केले आहे.
यंदाच्या वर्षी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान मराठा अर्थात एस इ बी सी आणि आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या इ डब्लू एस घटकाने प्रवेश प्रक्रिये दरम्यान आरक्षणाची नोंद केली नाही. त्यामुळे अनेक जागा शिल्लक राहण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयानेही मराठा समाजाला 12 टक्के आरक्षण मान्य केले आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी आरक्षण कोट्यात अर्ज दाखल केले नसतील त्यांनी अर्ज दाखल करावेत असे शेलार यांनी सांगितले.
त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांकडे मराठा जातीचे प्रमाणपत्र नसेल त्यांच्या पालकांनी केवळ हमीपत्र द्यायचे आहे. तसेच आर्थिक मागास विद्यार्थ्यांना ही चालू आर्थिक वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत त्या विद्यार्थ्यांना उत्पन्नचा दाखल द्यावा लागणार आहे.
यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा विद्यार्थ्यांसाठी 12 टक्के आरक्षणानुसार पुणे, नागपूर, नाशिक, मुंबई आणि अमरावती विभागात एकूण 34 हजार 251 जागा आहेत. पण त्यासाठी 4 हजार 557 एवढ्याच मराठा विद्यार्थ्यांनी आरक्षणाची नोंद केली आहे. तर आर्थिक मागास वर्गाला 28 हजार 636 जागा आहेत. मात्र 2600 विद्यार्थ्यांनाच अर्ज केले असल्याची माहिती शिक्षण मंत्री शेलार यांनी दिली. अर्ज नोंदणी साठी अकरावीच्या ऑनलाइन साईट वर यासंदर्भातली माहिती उपलब्ध करून दिली जाईल असेही त्यांनी सांगितले.