मुंबई : बहुचर्चित पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारच्या प्रकरणात जामीनावर बाहेर असलेल्या संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांना सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एमजी देशपांडे यांनी या प्रकरणात जामीन मंजूर केला होता. या जामीनाला ईडीकडून आव्हान देण्यात आले असून आज मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात सुनावणी होणार आहे. जर उच्च न्यायालयाने ईडीची मागणी मान्य केली तर संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.
उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचा आरोप संजय राऊत यांच्यावर आहे. त्याप्रकरणी त्यांना अटकदेखील झाली होती. काही महिने ते भायखळाच्या तुरुंगामध्ये होते. मात्र त्यांच्या वकिलांनी बाजू मांडल्यानंतर सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एमजी देशपांडे यांनी संजय राऊत यांचा गुणवत्तेच्या आधारे जामीनाचा अर्ज मान्य करत त्यांना जामीन दिला होता. या जामीन मिळाल्याच्या काही दिवसानंतर अंमलबजावणी संचलनालयाने ज्येष्ठ अधिवक्ता अनिल सिंग यांच्यामार्फत या जामीन अर्जाला आव्हान दिले. मात्र या आव्हान याचिकेवर उच्च न्यायालयामध्ये सुनावणी अद्यापही नियमित पद्धतीने सुरू झालेली नाही. आज त्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी होईल.
सुनावणीसाठी वकिलांचा प्रश्न : ईडीच्या या आव्हान याचिकेवर मागे एकदा उच्च न्यायालयात सुनावणी ठेवण्यात आली होती. पण न्यायालयाने कामामुळे सुनावणी तहकूब केली होती. यावर ईडीच्या अधिवक्तांनी प्रश्न केला होता.