महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'रेनिसन्स स्टेट' पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती - भाजपचा आरोप

रेनिसन्स स्टेट या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबाबत बिनबुडाचे ऐतिहासिक तपशील दिल्याबद्दल ज्येष्ठ संपादक गिरीश कुबेर यांनी माफी मागावी, तसेच महाराष्ट्र सरकारने तत्काळ या पुस्तकावर बंदी आणावी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर
भाजप आमदार अतुल भातखळकर

By

Published : May 25, 2021, 11:54 AM IST

मुंबई- रेनिसन्स स्टेट या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबाबत बिनबुडाचे ऐतिहासिक तपशील दिल्याबद्दल ज्येष्ठ संपादक गिरीश कुबेर यांनी माफी मागावी, तसेच महाराष्ट्र सरकारने तात्काळ या पुस्तकावर बंदी आणावी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. चुकीच्या लेखांमुळे वादग्रस्त ठरलेल्या गिरीश कुबेर यांनी त्यांच्या रेनिसन्स स्टेट या पुस्तकात ही बदनाम परंपरा कायम राखली आहे. छत्रपती संभाजी महाराजांबाबत अत्यंत चुकीची माहीती त्यांच्या पुस्तकात दिली आहे, या माहितीला समकालिन इतिहासातील कोणतेही पुरावे नाहीत. थोरल्या छत्रपतींचा वारसा पुढे नेणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांबाबत दिलेला हा बदनामीकारक मजकूर संतापजनक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर वारसाचा प्रश्न सोडविण्यासाठी संभाजी महाराजांनी रक्तपात केला. त्यांनी सोयराबाई राणीसाहेब आणि शिवाजी महाराजांनी तयार केलेल्या अष्टप्रधान मंत्रीमंडळातील मंत्र्यांना ठार केले. या रक्तपातामुळे शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली कर्तबगार मंडळी नाहीशी झाली, असे बिनबुडाचे दावे कुबेर यांनी केले असल्याचे भाजप आमदारांनी म्हटले आहे.

गिरीश कुबेर यांनी केले बिनबुडाचे दावे

आमदार अतुल भातखळकर
संभाजी महाराजांनी सोयराबाई राणीसाहेबांना ठार मारल्याचा कोणताही समकालीन पुरावा उपलब्ध नाही. अष्टप्रधान मंडळातील सदस्य असलेले संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी जात असताना स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहीते यांनी त्यांना अटक केली. परंतु पुढे त्यांना मुक्त करण्यात आले आणि मुजुमदार हे पद देण्यात आले. मे १६८१ नंतर आण्णाजी दत्तोंनी पुन्हा दुसऱ्यांदा बंडखोर अकबराच्या सहाय्याने संभाजी महाराजांना कैद करण्याचे नियोजन केले. ही गोष्ट संभाजी महाराजांना कळताच त्यांनी कठोर पाऊल उचलत आण्णाजी दत्तोंना मृत्यूदंडाची शिक्षा दिली.

कुबेरांचे खोडसाळ दावे
शिवाजी महाराजांच्या सैन्याने सामान्य प्रजेवर कधीही अत्याचार केले नाहीत, मात्र संभाजी महाराजांच्या सैन्याने केले. संभाजी महाराजांकडे शिवाजी महाराजांप्रमाणे सहनशीलता नव्हती आणि परराष्ट्रविषयक धोरणही नव्हते, असे अनेक खोडसाळ दावे करताना कुबेरांनी इतिहासातील अनेक महत्वाचे तपशील नजरेआड केले आहेत. कुबेर यांनी केलेले दावे संतापजनक असल्याचे आमदार भातखळकर म्हणाले.

पुस्तकावर बंदी घालावी अशी आग्रही मागणी
गिरीश कुबेर लिखित खोडसाळपणाचे गाठोडे असलेल्या या पुस्तकाने महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानाला अपमानित करण्याचे काम केले आहे. ठाकरे सरकारने जनभावनेची तत्काळ दखल घेऊन या पुस्तकावर बंदी घालावी. पुस्तकाच्या बाजारात उपलब्ध असलेल्या प्रती तत्काळ मागे घ्याव्यात. कुबेरांनी याप्रकरणी माफी न मागितल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आमदार भातखळकर यांनी केली आहे.

हेही वाचा-अखेर ‘त्या’ विधानावरून आदित्य नारायणने मागितली अलिबागकरांची माफी

ABOUT THE AUTHOR

...view details