मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आज मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, 2002 अंतर्गत महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या मालकीची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. नवाब मलिक यांना संपत्ती मधून 11.70 कोटी रुपये मिळत होते. मलिकांच्या मुंबई, उस्मानाबाद येथील मालमत्तांवर टाच आली आहे. यात गोवाला कंपाऊंड, कुर्ला, मुंबई येथील व्यावसायिक युनिट, उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतजमीन क्षेत्रफळ ५९.८१ हेक्टर (एकूण क्षेत्र १४७.७९४ एकर) मुंबईतील तीन फ्लॅट तसेच वांद्रे पश्चिम, मुंबई येथे दोन निवासी सदनिका आदिंचा समावेश आहे.
ईडीने न्यायालयात काय दावा केला होता ? :ईडीने मलिक यांना सत्र न्यायालयात हजर केले. त्यावेळी ईडीच्या वतीने अतिरिक्त महान्याय अभिकर्ता अनिल सिंह यांनी बाजू मांडली. दाऊद हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे. त्याची अनेक ठिकाणी बेकायदा संपत्ती असून 3 फेब्रुवारीला दाऊदविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हसिना पारकरच्या माध्यमातून दाऊद भारतातील व्यवहार करायचा. तिच्या माध्यमातून अनेक ठिकाणी संपत्ती गोळा करण्यात आली. हसिना पारकर आणि नवाब मलिक यांच्यात आर्थिक संबंध असून, तिच्याशी संबंधित मालमत्ता नवाब मलिक यांनी खरेदी केली. कुर्ला येथील मालमत्ता ही दाऊदच्या हस्तकांशी संबंधित होती. ती नवाब मलिकांच्या कुटुंबियांची मालकी असलेल्या कंपनीच्या नियंत्रणात आहे.