मुंबई : सत्तासंघर्षाच्या सुनावणीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने मोठा दणका दिला आहे. आयएल अँड एफएस प्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना नोटीस पाठवली आहे. त्यांना उद्या हजर राहण्याची सूचना नोटीसमध्ये करण्यात आली आहे.
ईडीने आयएल अँड एफएसशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात कोहिनूर कन्स्ट्रक्शनला दिलेल्या कर्जासंदर्भात राज ठाकरे यांचीही चौकशी केली होती. या प्रकरणात एका व्यक्तीला अनेक कंत्राट मिळाली होती. त्या व्यक्तीने अनेकांना कमिशन दिल्याचा ईडीला संशय आहे. त्याची पडताळणी करण्यासाठी जयंत पाटलांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र जयंत पाटील यांनी मला कोणतीही नोटीस आली नसल्याचे म्हटले आहे.
सोमवारी होणार चौकशी-ई़डीने यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, नवाब मलिक यांना नोटीस पाठविली. त्यापाठोपाठ आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनादेखील ईडीची नोटीस मिळाल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला शह देण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आल्याची चर्चा आहे. उद्या जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी होणार आहे. मात्र, आता या नोटीसवर जयंत पाटील काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न, राजकीय वर्तुळात चर्चा-महाराष्ट्र सत्तासंघर्षाचा आज निकाल येणार आहे. त्याचवेळी ईडीची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीवर दबाव टाकण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जयंत पाटील यांना ईडीची नोटीस बजावण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना धक्का बसला आहे. जयंत पाटील यांना आयएल आणि एफएस प्रकरणी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएसच्या माध्यमातून आर्थिक मोठा गैरव्यवहार केला गेला असल्याचा आरोप करण्यात आला होता.
शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर झाले होते भावूक-राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर जयंत पाटील भावूक झाले होते. अध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घेऊन मार्गदर्शन करावे, असा त्यांनी आग्रह धरला होता. शरद पवारांनी राजीनामा मागे घेण्याबाबत मुंबईतील बैठकीला जयंत पाटील गैरहजर होते. त्यावर बैठकीला निमंत्रण मिळाले नसल्याचे पाटील यांना माध्यमांना सांगितले होते. त्यावरून जयंत पाटील यांना पक्षात एकटे पाडण्यात येत असल्याच्या राजकीय चर्चा सुरू झाल्या होत्या.