मुंबई :येस बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून कारवाई करण्यात आली असून भारतातील व परदेशातील तब्बल 2 हजार 203 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आलेली आहे. ही संपत्ती येस बँकेचे संस्थापक राणा कपूर व डीएचएफएल चे कपिल वाधवान व धीरज वाधवान यांच्या मालकीची असल्याचे समोर आलेला आहे.
येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांची मुंबई, दिल्ली, पुणे येथील 792 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. यात खुर्शीदाबाद येथील आलिशान इमारत, मुंबईतील कंबाला हिल येथील घर, नेपियांसी रोड येथील घर, त्याचप्रमाणे नरिमन पॉइंट येथील आलिशान फ्लॅट, वरळी इंडियाबुल्स येथील 8 फ्लॅटचा समावेश आहे. याबरोबरच दिल्लीतील अमृत शेरगिल मार्गावरील तब्बल 685 कोटी रुपयांची किंमत असलेला बंगलासुद्धा ईडीकडून जप्त करण्यात आलेला आहे.
तर, दुसरीकडे डीएचएफएलचे कपिल वाधवान, धीरज वाधवान, यांची तब्बल 1 हजार 411 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आलेली आहे. यामध्ये मुंबईतील खार परिसरातीलब 12 आलिशान फ्लॅट्सचा समावेश आहे. परदेशातील न्यूयॉर्कमधील एक फ्लॅट, लंडनमधील दोन फ्लॅट, याबरोबरच पुण्यातील जमीनसुद्धा जप्त करण्यात आलेली आहे. शिवाय कमर्शियल प्रॉपर्टी आणि काही महागड्या गाड्यांसह, 344 बँक अकाऊंटसुद्धा ईडीकडून जप्त करण्यात आलेले आहेत.
दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने राणा कपूर, त्याचे कुटुंबीय आणि इतरांवर 4 हजार 300 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. कोट्यवधी रुपयांच्या मोबदल्यात आरोपींनी बेकायदेशीरपणे येस बँकेतून कर्जांचे वाटप केले. त्यानंतर हे कर्ज बुडाल्याचे ईडीला तपासातून आढळले आहे. कपूरला ईडीने मार्चमध्ये अटक केली आहे. तेव्हापासून आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे.