मुंबई ED Raid MLA Ravindra Waikar : ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीनं आज सकाळपासून धाड टाकली आहे. सकाळी 8.30 वाजल्यापासून इडीचे पथक रविंद्र वायकर यांच्या जोगेश्वरी येथील राहत्या घरी छापेमारीची कारवाई करत आहेत. जोगेश्वरी येथील भूखंड प्रकरणी ईडीनं ही छापेमारीची कारवाई करत रवींद्र वायकर यांच्या घरासह सात ठिकाणी आज सकाळी छापे टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ईडीचे 10 ते 12 अधिकारी रविंद्र वायकर यांच्या घरी आज सकाळी वाजण्याच्या सुमारास पोहोचले. त्यानंतर त्यांनी छापेमारीची कारवाई सुरू केली आहे. उद्या आमदार अपात्र निकालाआधीची ईडीची ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळं विविध राजकीय तर्कवितर्क काढण्यात येत आहेत.
500 कोटींचा घोटाळा :रवींद्र वायकर यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेसोबत केलेल्या कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी केला. त्यानंतर रवींद्र वायकर यांच्याविरोधात आरोपाप्रकरणी कारवाई सुरू आहे. महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर क्लब आणि आलिशान हॉटेल बांधून 500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप माजी खासदार सोमैया यांनी होता. त्यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं आमदार वायकर यांची चौकशी केली होती. आमदार रवींद्र वायकर (शिवसेना ठाकरे गट) आणि त्यांच्या पत्नीसह इतरांविरुद्ध 14 सप्टेंबर 2023 ला गुन्हा दाखल केलाय.
- या प्रकरणात कोणावर आहेत आरोप? आमदार रवींद्र वायकर, त्यांची पत्नी मनीषा वायकर, व्यवसाय भागीदार आसू नेहलवाई, राज लालचंदानी, पृथ्वीपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरुण दुबे यांच्याविरुद्ध फसवणूक केल्याच्या आरोपांचा समावेश आहे.