मुंबई :वाँटेड ड्रग्ज माफिया कैलाश राजपूतचा जवळचा साथीदार ड्रग्ज माफिया अली असगर शिराझी याच्याविरोधात ईडीनं कारवाईचा फास आवळला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ड्रग्ज माफिया अली असगर याच्याविरोधात अमली पदार्थांच्या तस्करीच्या खटल्याचा भाग म्हणून ईडीनं मुंबईतील अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. याशिवाय, या प्रकरणासंदर्भात काही लोकांना ईडीनं समन्स बजावलं आहे. शिराझी याच्यावर २०० कोटी रुपयांच्या अमली पदार्थांची युरोप आणि ऑस्ट्रेलियात तस्करी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणीच ईडीनं मुंबईतील सात ठिकाणी छापेमारी केली.
ड्रग्ज मुंबईतून विदेशात पाठवल्याचा ठपका -मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी कक्षानं मे महिन्यात असगर शिराझी (वय ४०) याला अटक केली होती. मार्चमध्ये मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केलेल्या केटामाइन आणि व्हायग्रा तस्करी प्रकरणात शिराझी हा महत्त्वाचा दुवा असल्याचे म्हटले जात होते. मुंबई पोलिसांनी 15 मार्चला अंधेरी पूर्व येथील कुरिअर कार्यालयावर छापा टाकून सुमारे 8 कोटी रुपये किमतीचे 15 किलो केटामाइन आणि व्हायग्राच्या 23 हजार गोळ्या जप्त केल्या होत्या. जप्त केलेल्या साहित्याची कुरिअर सेवेचा वापर करून ऑस्ट्रेलिया आणि यूकेमध्ये तस्करी केली जात असल्याचा आरोप आहे. याच प्रकरणी ईडीनं दखल घेऊन ड्रग्ज माफिया शिराझी त्याच्याशी संबंधित मुंबईत छापेमारी केली आहे. दोनशे कोटींचे ड्रग्ज मुंबईतून विदेशात पाठवल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.