मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांचे व्यावसायिक निकटवर्तीय सुजीत पाटकर यांनी रातोरात लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनी स्थापन करुन कोविड सेंटर उभारणीची कंत्राट मिळवले. याच कोविड सेंटरच्या माध्यमातून डाॅक्टरांची नियुक्ती, औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि अन्य साहित्य खरेदीमध्ये करोडो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मनी लाॅंड्रींग कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन ईडी तपास करत आहे.
अधिक ठिकाणी केली छापेमारी : ईडीने गेल्या बुधवारी आणि गुरुवारी घोटाळ्याशी संबंधित असलेल्या मनपा अधिकारी, कंत्राटदार, मध्यस्थ अशा संबंधितांच्या घर, कार्यालये आणि मालमत्तांसह पालिकेचे कार्यालय अशा १६ हून अधिक ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीत ईडीच्या हाती महत्वपूर्ण कागदपत्रे आणि दस्तऐवज लागले आहेत. याच्याच आधारे ईडीने पुढील तपास करत आता संबंधितांकडे चाैकशी सुरु केली आहे. याचाच भाग म्हणून ईडीने सोमवारी जयस्वाल आणि चव्हाण यांना चाैकशीसाठी बोलावले.
कडेकोट बंदोबस्त : जयस्वाल हे चाैकशीला हजर राहीले नाहीत. पण, चव्हाण हे सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास काही कागदपत्रांसह ईडी कार्यालयात दाखल झाले. सूरज चव्हाण यांच्या ईडी चौकशीचा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून निषेध करण्यात येणार होता. त्यामुळे मुंबई पोलिसांनी सोमवारी सकाळपासूनच बेलार्ड पिअर परिसरात ईडी कार्यालयाबाहेर बॅरीगेटस् लाऊन कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. चव्हाण ईडी चौकशीला हजार होताना काही कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाजवळ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना वाटेतच अडवले.