मुंबई - साई रिसॉर्ट प्रकरणी आज ईडीने मोठी कारवाई केली आहे. आमदार अनिल परब यांचे निकटवर्तीय असलेले सदानंद कदम यांना ईडीने चौकशीनंतर अटक केली आहे. त्यामुळे आता अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. साई रिसॉर्ट प्रकरण भाजप नेते किरीट सौमय्या यांनी लावून धरले होते.
सोमय्या विरुद्ध परब - माजी खासदार किरीट सोमय्या विरुद्ध आमदार अनिल परब यांच्यात गेल्या काही दिवसांपासून साई रिसॉर्टचा वाद रंगला. दापोली येथील साई रिसॉर्ट हे आमदार अनिल परब यांच्या मालकीचे आहे. तसेच ते अनधिकृत असल्याचा आरोप सोमय्यांनी सर्वांत आधी केला. तसेच या रिसॉर्ट बांधकामप्रकरणी अनिल परब यांच्याविरोधात भादंवि कलम ४२० नुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती सोमय्या यांनी दिली होती.
साई रिसॉर्टवर प्रतिकात्मक हातोडा - साई रिसॉर्ट माझे नसल्याचा दावा सातत्याने अनिल परब यांच्याकडून केला जात होता. ईडीमार्फत या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे. दुसरीकडे हा रिसॉर्ट तोडण्याचे आदेश देण्यात आले होते.या रिसॉर्टवर कारवाई होणार असल्याचे सोमय्यांचे म्हणणे होते. त्यामुळेच याआधी सोमय्या दापोलीत आले होते. तसेच त्यांनी प्रतिकात्मक हातोडा या रिसॉर्टवर मारला होता.