मुंबई : ED Action On Ranbir Kapoor :ज्येष्ठ अभिनेता ऋषी कपूर यांचा पुत्र रणबीर कपूरला ईडीने समन्स पाठवले असून महादेव गेमिंग लॉटरी प्रकरणी चौकशी होणार आहे. ६ ऑक्टोबरला रणबीर कपूरला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रणबीर कपूर महादेव अॅपचे प्रमोशन करत होता. ईडीने असा दावा केला आहे की, त्याला या प्रमोशनसाठी मोठी रक्कम रोख स्वरूपात मिळाली आहे. महादेव अॅपचे संस्थापक असे ४ ते ५ समान अॅप्स चालवत आहेत. हे अॅप युएई मधून चालवले जात असून या अॅपचे कॉल सेंटर्स श्रीलंका, नेपाळ आणि युएईमध्ये आहेत.
करोडोंची अफरातफर झाल्याचा दावा:बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार सध्या ईडीच्या रडारवर आहेत. अभिनेता टायगर श्रॉफ, गायिका नेहा कक्कर, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक, राहत फतेह अली खान, विशाल ददलानी यासह अनेक दिग्गज ईडीच्या रडारवर आहेत. भारती सिंग, नुसरत भरुचा, आतिफ अस्लम यांचंही नाव तपासात समोर आल्याने बॉलीवूड विश्वात खळबळ माजली आहे. बॉलिवूडमधील १४ पेक्षा अधिक नाव ईडीच्या रडारवर आहेत. महादेव बेटींग अॅपच्या माध्यमातून करोडोंची अफरातफर होत असून काही सेलिब्रिटी आणि सरकारी अधिकाऱ्यांना यातून पैसे गेल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. योगेश पोपट नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून हवाला रॅकेट चालवले जात असल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. गोविंद केडिया नावाच्या व्यक्तीच्या घरी १८ लाख रोख रक्कम आणि १३ कोटींचे सोन्या-चांदीचे दागिने ईडीला आढळून आले आहेत.