मुंबई Economic Offence Wing : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं (EOW) जाहिरात कंपनीसोबत सुमारे 11 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन भावांना अटक केलीय. अमित वाधवानी आणि विकी वाधवानी अशी या अटक केलेल्या भावांची नावं आहेत.
कंपनीचं प्रमोशन करण्यासाठी दिलं होतं कंत्रात : आर्थिक गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार मनीष तुलसीदास ठक्कर यांची कंपनी जाहिरातीचं काम करते. वाधवानी यांनी त्यांच्या कंपनीला प्रमोशन करण्यासाठी हे कंत्राट दिलं होतं. वाधवानी यांची साई इस्टेट कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. या कंपनीच्या व्यवसायवाढीसाठी ठक्करला 2017 मध्ये कंत्राट देण्यात आलं होतं. एकूण 17 ते 18 कोटी रुपयांचं कंत्राट ठक्करला देण्यात आलं होतं. ठक्कर यांच्या कंपनीनं वाधवानी यांच्या कंपनीची वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या आणि ऑनलाइन माध्यमातून जाहिरात केली. ते पूर्ण केल्यानंतर त्यांना एकूण 312 पावत्या देण्यात आल्या. या कामासाठी निश्चित केलेल्या पैशांपैकी केवळ 11 कोटी रुपयेच ठक्कर यांना देण्यात आले.
फसवणूक करणाऱ्या दोघा भावांना अटक : ठक्कर यांनी ईओडब्ल्यूकडे दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की, 'ते वाधवानी यांच्याकडं पैसे मागण्यासाठी गेले असता सुरुवातीला त्यांनी टाळाटाळ केली. मात्र, काही दिवसांनी वाधवानी यांच्या कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या बाऊन्सर्सनी ठक्कर यांना वाधवानी यांच्या कार्यालयात जाण्यापासून रोखलं आणि धक्काबुक्कीही केली. वाधवानी ब्रदर्स आपले पैसे देणार नसल्याचे ठक्कर यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी याबाबत ईओडब्ल्यूकडे तक्रार केली. ठक्कर यांच्या तक्रारीवरून ईओडब्ल्यूनं वाधवानी बंधूंविरुद्ध भारतीय दंड संविधान कलम 409, 420, 506 आणि 34 अंतर्गत एफआयआर नोंदवला आणि दोघांनाही अटक केलीय. अटक केलेल्या अमित वाधवानी आणि विक्की वाधवानी यांना न्यायालयात हजर करण्यात आलं असून दोघांना न्यायालयानं 20 जानेवारीपर्यंत कोठडीत सुनावलीय, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्यानं दिलीय.
हेही वाचा :
- बिनव्याजी कर्जाचे आमिष दाखवून 400 ग्राहकांची 1 कोटींची फसवणूक, संचालकाला अटक
- पैशाचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून भोंदू बाबानं पळविले १८ लाख रुपये, पाहा कसा घातला तरुणाला गंडा
- मुंबई हायकोर्टाच्या माजी मुख्य न्यायाधीशांना लिंक पाठवून सायबर चोरट्याने घातला गंडा