नवी मुंबईMumbai Earthquake :नवी मुंबई परिसरातील पनवेल तालुक्यासह कामोठे शहरात आज रविवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के बसले. या वेळी अनेक इमारती हालल्याचं सांगितलं जात आहे. तसंच घरातील समान देखील काही अंशी हलताना दिसून आलं, असं नागरिकाचं म्हणणं आहे. हादरे येण्यापूर्वी एक मोठा आवाज झाल्याचा दावा देखील नागरिकांनी केला आहे. आवाजानंतर काही सेकंदासाठी कंप झाल्याचं जाणवलं. मात्र हा भूकंपाचा धक्का सौम्य असल्याचं सांगितलं जात आहे.
पनवेल परिसरात भूकंपाचे हादरे बसण्यापूर्वी एक मोठा आवाज झाला. काही सेकंदासाठी जमिनीचा कंप झाल्याचं जाणवलं. पनवेल तालुका परिसरात बसलेला धक्का सौम्य असल्याने कोणत्याही प्रकारच नुकसान झालं नाही. अरबी समुद्रात भूकंपाचं केंद्र होतं.- गणेश देशमुख, पनवेल महापालिका आयुक्त
2.9 रिश्टर स्केलचा सौम्य धक्का :नवी मुंबई, पनवेल परिसराला 2.9 रिश्टर स्केलच्या सौम्य भूकंपाचा धक्का बसला. भूगर्भातून येणारा काही सेकंदांचा आवाज आणि भूकंपाच्या सौम्य धक्क्याने पनवेल आणि नवी मुंबईतील खाडीलगतच्या इमारतींमधील रहिवाशांमध्ये घबराट पसरली होती. नेमकं काय घडले याची माहिती मिळण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना अनेक तास लागले. वेधशाळेकडून मिळालेल्या विश्वसनीय माहितीनंतर अखेर दुपारी पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी हा सौम्य भूकंप असल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं. नवी मुंबईजवळील समुद्रकिनाऱ्यापासून 15 किलोमीटर परिसरात 2.9 तीव्रतेचा भूकंप झाला.
भूकंपाचे हादरे बसण्यापूर्वी आला मोठा आवाज : अनेक वर्षांनंतर या भागात भूकंपामुळं नागरिकात भीती निर्माण झाली होती. रविवारी सकाळी झालेल्या भूकंपानं अनेकांची घरे काही सेकंदांसाठी हादरली. मोठा आवाज झाल्याचं कामोठे येथील नागरिकांनी सांगितले. अनेकांनी घराच्या खिडक्या उघडून बाहेर काही झाले का, याची चौकशी केली. मात्र इतर सिडको वसाहतींमध्येही असेच धक्के जाणवल्याचं नागरिकांनी सांगितलं.
हेही वाचा -
- हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; सुदैवानं जीवितहानी नाही
- Delhi Earthquake : राजधानी दिल्ली पुन्हा हादरली! चार दिवसांत दुसऱ्यांदा भूकंप
- Nepal Earthquake News : भय इथले संपत नाही! आणखी एका भूकंपानं हादरला नेपाळ, शुक्रवारच्या भूकंपात 157 लोकांचा मृत्यू