मुंबई -कोकणातील गणोशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांबाबतचा गेले कित्येक दिवसांपासून रेंगाळलेला प्रश्न आज अखेर सुटला आहे. आज(मंगळवार) संध्याकाळी 6 वाजल्यापासून एसटी महामंडळाच्या संकेतस्थळावर एसटीचे आरक्षण सुरू होणार आहे. तसेच एसटीने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना ई पासची आवश्यकता नसणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी आज दिली.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना राज्य सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. गणोशोत्सवसाठी कोकणात एसटीने प्रवास करणाऱ्यांना ई-पासची गरज लागणार नाही. पण खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना ई-पास अनिवार्य असणार आहे. जे चाकरमानी कोकणात जातील त्यांना 12 ऑगस्टपर्यंत पोहोचायचे आहे. त्यानंतर त्यांना 14 दिवसांऐवजी 10 दिवसांचा होम क्वारंटाइन राहावे लागणार आहे. 12 ऑगस्टनंतर ज्यांना कोकणात जायचे असेल त्यांनी मागील 48 तासांत कोरोना चाचणी करणे गरजेचे असल्याचे अनिल परब म्हणाले. एसटीने प्रवास करण्यासाठी 22 जणांचा एक ग्रुप असेल. ग्रुप बुकींग केल्यास थेट त्या गावात एसटी जाईल आणि एसटी कुठेही थांबणार नाही.