मुंबई - राज्यातील निवासी डॉक्टरांना अखेर राज्य वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने दिलासा दिला आहे. 5 दिवस काम आणि 2 दिवस सुट्टी अशा कामाच्या वेळेतील बदलाचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे. तर, आता नवीन बदलानुसार निवासी डॉक्टरांना 9 दिवस काम आणि 6 दिवस सुट्टी अर्थात क्वारंटाईन अशा पद्धतीने काम करावे लागणार आहे.
निवासी डॉक्टरांच्या कामाच्या वेळेत पुन्हा बदल; आता 9 दिवस काम, 6 दिवस क्वारंटाईन - mard doctor mumbai news
वैद्यकीय शिक्षण विभागाने निवासी डॉक्टरांच्या कामाच्या वेळेत 9 दिवस काम आणि 6 दिवस क्वारंटाईन असे बदल केले आहे. यानुसार आता निवासी डॉक्टरांच्या कामाच्या वेळा लावण्यात येणार आहेत.
निवासी डॉक्टरांची फौज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवसरात्र काम करत आहे. मात्र, रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आता रुग्णालय आणि मनुष्यबळही कमी पडू लागले आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या 7 दिवस काम आणि 7 दिवस सुट्टी, अशी कामाची वेळ काही दिवसांपूर्वी बदलण्यात आली. तर, नवीन बदलानुसार 5 दिवस काम आणि 2 दिवस सुट्टी असे बदल करण्यात आले. या बदलानंतर निवासी डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली होती.
डॉक्टरांचा संपर्क थेट कोरोना रुग्णांशी येत असल्याने त्यांना संसर्ग होण्याची भीती जास्त असते. अशावेळी लक्षणे समजण्यासाठी किमान 5 दिवस क्वारंटाईन असणे गरजेचे आहे. अशावेळी दिवसाच्या सुट्टीत, क्वारंटाईनमध्ये लक्षणे कसे समजणार, असे म्हणत मार्डने यावर आक्षेप घेतला होता. तर 9 दिवस काम आणि 8 दिवस सुट्टी (क्वारंटाईन) देण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार आता वैद्यकीय शिक्षण विभागाने आता 9 दिवस काम आणि 6 दिवस क्वारंटाईन असे बदल केले आहे. यानुसार आता निवासी डॉक्टरांच्या कामाच्या वेळा लावण्यात येणार आहेत.