मुंबई - राष्ट्रीय सुरक्षा उप-सल्लागारपदी महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता त्यांची नियुक्ती करणे हे केंद्र सरकारचे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
हेही वाचा -महाराष्ट्र-हरियाणा विधानसभा : जुन्या नेत्यांनी पुन्हा सिद्ध केली आपली ताकद
सध्या अजित डोवाल हे देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. आता त्यांच्या खालोखाल पडसलगीकर उप-सुरक्षा सल्लागारपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. दत्ता पडसलगीकर यांनी याआधी विविध पदांवरील जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांच्याकडे गुप्तचर विभागात काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव असून मुंबई पोलीस आयुक्तपदावरही ते कार्यरत होते.
पडसलगीकर यांनी यापूर्वी ‘आयबी’मध्ये संचालकपदावरही आपली सेवा बजावली आहे. प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून पडसलगीर हे परिचयाचे आहेत. दोन दशकांहून अधिक काळ त्यांनी गुप्तहेर खात्यात कर्तव्य बजावले असून अनेक गुंतागुंतीच्या मोहिम हाताळल्या आहेत. यानंतर त्यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक पदाची धुराही योग्यरितीने पार पाडली. आता भारत सरकारकडून त्यांची राष्ट्रीय सुरक्षा उप-सल्लागारपदी नियुक्ती होणे, हा केंद्रीय पातळीवर सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा बदल मानला जात आहे.
पडसलगीकर 1982 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.