मुंबई- काल संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहत दत्त जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राज्यातील विविध मंदिरात श्रींचा जयघोष करून सर्वांनी दत्त जन्मोत्सवाचा आनंद साजरा केला. यावेळी लाखो भाविकांनी श्रींच्या मूर्तीचे दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला.
राज्यातील विविध जिल्ह्यात दत्त जयंती उत्साहात साजरी नाशिक- दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रांवर श्री. दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अवधूत चिंतन श्री. गुरुदेव दत्त असा जयघोष करण्यात आला. बुधवारी भल्या पहाटेपासून सर्व स्वामी समर्थ केंद्रांवर यज्ञ, नामजप, आरती, महाप्रसाद या सर्व गोष्टींची लगबग दिसून येत होती. बरोबर १२.२५ वाजता श्री. गुरुचरित्रमधील चौथ्या अध्यायाचे वाचन सुरू झाले. त्यानंतर १२.४९ वाजता 'तीन बाळे झाली' या ओवीचे वाचन होताच अवधूत चिंतन श्री.गुरुदेव दत्तचा जयघोष करून सर्वांनी श्री. दत्त जन्माचा आनंद साजरा केला. दिंडोरी, त्र्यंबक सह सर्व केंद्रांवर अत्यंत शिस्तीत हा सोहळा संपन्न झाला. दिवसभरात लाखो भाविकांनी दर्शन व आशीर्वादाचा लाभ घेतला.
विशेष- दिंडोरीजवळील करंजी या गावी सती श्री. अनसूयेचे माहेर अर्थात श्री.दत्तप्रभूंचे आजोळ (महर्षी कर्दममुनींचे आश्रम) आहे. यालाच 'निर्जल मठ' असेही म्हणतात. याच परिसरात पराशर, मार्कंडेय, कण्व या तपस्वी महर्षींचेही आश्रम होते. साक्षात् श्रीकृष्णाने ज्यांचे वर्णन 'सिद्धाना कपिलो मुनीः' असे केले आहे, त्या कपिलमुनींनीही या स्थानी तपश्चर्या केलेली आहे.
आश्रमात श्री. दत्तप्रभूंची पद्मासनस्थित मूर्ती आहे. अशी मूर्ती अन्यत्र कोठेही पाहायला मिळत नाही. प्रत्यक्ष गंगामाईने श्री. दत्तप्रभूंची ही मूर्ती येथे तप केलेल्या श्री.शिवदयाळ स्वामींना प्रसादस्वरुप दिलेली आहे. मंदिरात असलेल्या देवघरात केंद्रस्थानी जेमतेम एक वित उंचीची ही पांढरी शुभ्र मूर्ती ठेवलेली आहे.
हिंगोली- शहरातील शक्ती ब्रह्मश्रम आत दत्त मंदिर परिसरात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला. जवळपास 40 वर्षांची परंपरा असलेल्या मंदिर समितीकडून १० दिवस अगोदरपासूनच महोत्सवाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली होती. जयंतीच्या दिवशी पहाटे ५ वाजता सामूहिक गायत्री होम-हवन अभिषेक व दत्त आरती झाली. त्यानंतर भाविकांना दत्त मूर्तीचे दर्शन घेता यावे यासाठी मंदिर खुले केले गेले. याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला श्रींचे दर्शन व्हावे यासाठी रांगांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच मंदिर प्रशासनाच्यावतीने महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते.
कोल्हापूर- कोल्हापूरच्या श्री. क्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्तजयंती निमित्त धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. नृसिंहवाडीला दत्ताची राजधानी म्हणतात. याठिकाणी मनोहर पादुका आहेत. दत्त जयंती निमित्त मंदिरात पहाटे चार वाजता काकड आरती करण्यात आली. त्यानंतर, दुपारी श्री. चरणावर महापूजा, पानपूजा बांधण्यात आली. यावेळी दत्त महाराजांच्या नामस्मरणाने भक्तीचा पाट ओसांडून वाहत होता.
पनवेल- शहरात ठिकठिकाणी दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पनवेलमधल्या खिडुकपाडा येथील दत्तमंदिरात श्री. दत्त जयंती सोहळ्यानिमित्त सायंकाळी उशिरापर्यत दर्शनासाठी भाविकाची गर्दी उसळलेली होती. मंदिरात गुरुचरित्र पारायणासोबत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात लघुरुद्राभिषेक, गुरुचरित्र पारायण, महिला भजनी मंडळांचा भजनाचा कार्यक्रम आदी कार्यक्रम घेण्यात आले. 'दत्ता दिगंबरा या हो, स्वामी मला भेट द्या हो,' असा गजर अभंगातून भगवान दत्तात्रेयांना आळवत भाविक भक्तिरसात चिंब झाले होते.
अहमदनगर- शिर्डीच्या साईबाबा मंदिरातही दत्त जयंतीचा उत्सव मोठया श्रद्धेने आणि उत्साहात पार पडला. सांध्याकाळी साई मंदिरात किर्तन पार पडले. त्यानंतर सांध्यकाळी ६ वाजता चांदीच्या पाळण्यात दत्तात्रयाची मूर्ती ठेवत दत्त जन्माचा पाळणा म्हणत दत्त जयंती साजरी करण्यात आली. दत्त जन्मोत्सवानंतर साईबाबांची धूप आरती झाली. या उत्सवात साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर हे सपत्नीक उपस्थित होते.
जिल्हयातील संगमनेर येथील अकलापूर श्री. दत्त मंदिराला १२०० वर्षापासूनचा इतिहास आहे. निसर्गरम्य ठिकाण आणि टेकडीत वसलेले हे एकमुखी दत्तगुरू पठार या भागातील भाविकांचे श्रद्धा स्थान आहे. काल दत्तजन्मोत्सव साजरा करण्यासाठी पठार भागासह, शहरातील भाविकांनी अकलापूर येथील श्री. दत्त मंदिरात मोठी गर्दी केली होती. यावेळी मंदिरात भगवान दत्तात्रयाची स्वंयभू मूर्ती असल्याने नवसाला पावणारा देव अशी या तीर्थस्थळाची प्रचिती असल्याचे भाविकांनी सांगितले.
अमरावती- शहरापासून जवळच असणाऱ्या श्रीक्षेत्र झिरी येथील पुरातन दत्त मंदिरात काल दत्त जयंती निमित्त उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दत्त जयंतीच्या पर्वावर शेकडो भाविकांची झिरी येथे गर्दी उसळली होती. दत्त जयंतीच्या पर्वावर संपूर्ण मंदिर आणि मंदिर परिसर हार आणि फुलांनी सजविण्यात आला होता. तसेच किर्तन आणि प्रवचनाचे आयोजनही करण्यात आले होते.
रत्नागिरी- शहरात काल दत्तजयंतीचा उत्सव ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री दत्त गुरूंच्या मूर्तीचे पूजन करून अभिषेक करण्यात आले. सकाळपासूनच दत्तांच्या मंदिरात गर्दी पहायला मिळाली. राजापूरमधील श्री दत्तगुरू सेवामंडळ शीळ वरचीआळी बाईतवाडी या ठिकाणी देखील दत्तजयंती साजरी करण्यात आली. दत्तमूर्तीवर सकाळी अभिषेक केल्यानंतर सामुहिक आरती देखील करण्यात आली.
रायगड- काल दत्त जयंतीच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यात सर्वत्र भक्तीमय वातावरणात उत्सव आणि यात्रांचे आयोजन करण्यात आले होते. महाडमधील शेंदूरमलई, अलिबागमधील चौल भवाळे, माणगावमधील विळे, म्हसळा येथील वारळ या गावातील दत्त मदिरांमध्ये उत्सवाच्या निमित्ताने यात्रांचे आयोजन केले जाते. या यात्रा चार ते पाच दिवस चालतात. तर, खोपोली येथील गगनगिरी महाराजांच्या मठात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील दत्त जयंती साजरी करण्यासाठी देशभरातून भक्तगण येतात.
हेही वाचा-मुख्यमंत्र्यांचा भाजपला आणखी एक दणका; महामंडळावरील नियुक्त्या करणार रद्द?