मुंबई -मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्यात सुरू असलेले आंदोलने आणि मराठा समाजाची एकूणच आक्रमक भूमिका लक्षात घेऊन त्यासंदर्भात काय उपाययोजना करता येतील यासाठी आज (दि.19 सप्टें.) वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बरीच खलबते झाली.
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री व पवार यांच्या तब्बल पाऊण तास ही बैठक झाली असून त्या बैठकीत प्रामुख्याने राज्यातील मराठा आरक्षणाच्या विषयावर सर्वाधिक चर्चा झाली असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येते.
मुंबईत कंगना राणौत आणि तिच्या माध्यमातून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची 9 सप्टेंबरला महत्त्वाची बैठक पार पडली होती. त्या बैठकीनंतर शिवसेनेकडून कंगना राणौत हा विषय बाजूला ठेवण्यात आला होता.आता राज्यात विरोधकांकडून मराठा आरक्षणाचा विषय राज्यभरात पेटवण्यासाठी रणनीती आखली जात असून त्यामुळेच विविध ठिकाणी आंदोलन सुरू झाली आहेत. यामुळेच राज्यातील ही एकूणच परिस्थिती कशी आटोक्यात आणता येईल यासाठी प्रामुख्याने मुख्यमंत्री आणि पवार यांच्यात महत्वाची बैठक झाली असल्याचे सांगण्यात येते.
दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात केंद्र सरकारने अत्यंत महत्वाची अशी पाच विधेयक मंजूर केली आहेत. त्यामध्ये देशातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राला मोठा फटका पडेल, या क्षेत्रातही खासगी भांडवलदारांनी मक्तेदारी वाढेल अशा स्वरूपाचे एक कृषी धोरण आणल्याने देशभरातून त्यावर विरोध सुरू आहे. यासाठीचाही विचार या बैठकीत झाला असल्याचे सांगण्यात येते.