मुंबई- विधानसभा निवडणुकीत ५६ जागा मिळवलेल्या शिवसेनेला ४ आमदारांचा पाठिंबा मिळाला असून सेनेचे संख्याबळ आता ६० झाले आहे. तर येत्या दोन दिवसात अनेक आमदार शिवसेनेला पाठिंबा जाहीर करणार असल्याचे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजप व सेना यांच्यात सत्ता स्थापनेसाठी येत्या काही दिवसात मोठी साठमारी दिसण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नाशिक पूर्व मतदारसंघात नुकताच पराभवाचा सामना करावा लागलेले बाळासाहेब सानप यांनी रविवारी मातोश्री येथे शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सानप यांना शिवबंधन बांधले. यावेळी राऊत यांनी भाजपने त्यांना असलेल्या २० आमदारांचे समर्थन दाखवावे, असे आपल्या मित्रपक्षाला थेट आव्हान दिले. शनिवारी रात्री प्रहार जनशक्तीचे अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि मेळघाटचे राजकुमार पटेल यांनी मातोश्री येथे जाऊन सेनेबरोबर असल्याचे सांगितले. यामध्ये ठाण्याचे नेते एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केली.
त्याबरोबरच, विदर्भातील रामटेकचे आशिष जयस्वाल आणि भंडाऱ्याचे नरेंद्र गोंडेकर या सेनेच्या बंडखोर आमदारांनी मातोश्री येथे जाऊन सेनेबरोबर असल्याचे सांगितले. या दोघा आमदारांना अनिल देसाई यांनी मातोश्रीपर्यंत आणले. अशा प्रकारे सेनेचे ५६ असलेले संख्याबळ ६० झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमध्ये चंद्रकांत पाटील तर इचलकरंजीमध्ये प्रकाश आवाडे हे सेनेचे दोन बंडखोर निवडून आले आहेत. तेसुद्धा सेनेच्या मागे जातील अशी शक्यता आहे. त्यामुळे सेनेचे संख्याबळ ६२ पर्यंत जाऊ शकते.
३० ऑक्टोबर रोजी भाजपच्या विधिमंडळ गटनेता निवडीची बैठक आहे. अमित शहा मुंबईत येत आहेत. मागच्या प्रमाणे भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करणार असल्याची मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी राष्ट्रवादी भूमिका घेईल, असे म्हणत २०१४ ला शरद पवार यांनी भाजपला स्वबळावर सत्तेसाठी पाठिंबा दिला होता. आम्ही विरोधी पक्षात बसणार आहोत, असे यावेळी पवारांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे २०१४ प्रमाणे भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात राज्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे.