मुंबई - देशातील दिल्ली, गोवा, गुजरात आणि राजस्थानमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने येथून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात आहे. आता केरळ राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे, केरळ येथून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर चाचणी करण्यास सुरुवात केल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
माहिती देताना पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी हेही वाचा -राज्यपालांच्या सचिवांनी माहिती दडवल्याने खोळंबा; राज्य सरकारचे स्पष्टीकरण
..या चार राज्यांमधील प्रवाशांच्या चाचण्या
मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबई महापालिका आणि राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना काही प्रमाणात आटोक्यात आला आहे. कोरोना आटोक्यात येत असतानाच नोव्हेंबर महिन्यात दिल्ली, गोवा, गुजरात आणि राजस्थान या राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याचे निदर्शनास आले. या राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांमुळे मुंबईत आणि राज्यात कोरोना पसरू नये म्हणून राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्यापासून विमान, रेल्वे आणि रस्ते याद्वारे या राज्यांमधून प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांच्या चाचण्या करण्यास सुरुवात केली. या राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या चाचण्या आजही केल्या जात आहेत.
आणखी एका राज्याची भर
दिल्ली, गोवा, गुजरात आणि राजस्थान या चार राज्यातून येणाऱ्या प्रवाशांच्या चाचण्या सुरू असतानाच आता केरळ राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यासाठी बुधवार (१० फेब्रुवारी) पासून चेन्नई येथून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची चाचणी केली जात आहे. कोरोनाची लागण नसलेल्या प्रवाशांना होम क्वारंटाईन केले जात आहे. प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास त्यांच्यावर त्वरित उपचार केले जाणार असल्याची माहिती काकाणी यांनी दिली.
हेही वाचा -बबलू पत्रीचा साथीदार इब्राहिम शेखला त्याच्या लग्नावेळी एनसीबीने केली अटक