मुंबई - माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या भूगोलचा पेपर रद्द करण्यात आला आहे. नववी आणि अकरावीच्या परीक्षा तसेच दहावीचा भूगोलचा पेपर रद्द करून त्याऐवजी मुल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना सरसकट गुण देण्यात यावेत असा एक प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडून वर्षा गायकवाड यांना देण्यात आला होता. त्यानुसार पेपर रद्द केल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन दिली.
हेही वाचा-#coronavirus : राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय; राज्याची विभागणी रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता इयत्ता नववी आणि अकरावीच्या दुसऱ्या सत्रातील परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तर दहावीच्या भूगोल व कार्यशिक्षण या विषयाचीही परीक्षाही रद्द करण्यात आली आहे. यामुळे दहावीच्या भूगोल पेपरची वाट पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना यापासून दिलासा मिळाला आहे.
अखेर दहावीचा भूगोलचा पेपर रद्द...
दहावीच्या भूगोलचा पेपर 23 मार्च रोजी होणार होता. परंतु, राज्यात कोणाचे संकट अधिक गडद झाले आहे. त्यामुळे हा पेपर पुढे ढकलण्याची घोषणा करण्यात आली होती. कोरोणाचे संकट लक्षात घेऊन हा पेपर रद्द करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना, लोकभारती आदी शिक्षक संघटनांनी केली होती. तर दुसरीकडे राज्यात कोरोनाचे संकट अधिकच वाढत असल्याने ही परीक्षा घेणे कठीण असल्याची बाबही शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली होती.
त्यामुळे आज शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय जाहीर केला असून यामुळे तब्बल 17 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. दहावीचा पेपर रद्द करण्याची वेळ पहिल्यांदाच आली आहे. या पेपरला विद्यार्थ्यांना त्यांच्या मुल्यांकनानुसार गुण द्यायचे की सरसकट द्यायचे याचा विषयही येत्या काही दिवसात निकाली लागणार आहे.