मुंबई - कोरोनाचे अभूतपूर्व संकट लक्षात घेऊन राज्य सरकारने विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. असे असतानाच मुंबईतील एका नामांकित महाविद्यालयाने अकरावील तब्बल ६० विद्यार्थ्यांना नापास केले आहे. नापास करण्यात आलेले सर्व विद्यार्थी हे विज्ञान शाखेतील आहेत.
माटुंगा येथील रुपारेल महाविद्यालयातील हे विद्यार्थी आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. रुपारेल महाविद्यालयांने नुकतेच अकरावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला असून त्यासाठीची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना कळवली आहे. त्यात तब्बल ६० विद्यार्थ्यांना नापास केल्याचे समोर आले आहे.
अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठीची प्रक्रिया दरवर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यापर्यंत सुरू असते. त्याच दरम्यान अनेक महाविद्यालयांमध्ये पहिल्या चाचण्या आणि अभ्यासक्रमही सुरू केला जातो. रूपारेल महाविद्यालयात प्रथम सत्राच्या परीक्षा आणि दोन चाचणी (युनीट) परीक्षाही पूर्ण झाल्या आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या सत्राची म्हणजेच अंतिम वर्षाची परीक्षा होऊ शकली नाही. अशातच रुपारेल महाविद्यालयाने ६० विद्यार्थ्याना नापास केले असल्याने पालकांमध्ये या विषयी संताप व्यक्त केला जात आहे.