मुंबई -महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये २३ जिल्हा रुग्णालये, ३० उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालये आणि ३२ प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच महानगरपालिकांमध्ये २९ शहरी आरोग्य केंद्रे, मनपा रुग्णालय अशा एकूण ११४ ठिकाणी कोरोना लसीकरणासाठी रंगीत तालीम (ड्राय रन) यशस्वीरित्या झाली, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
गरिबांना मोफत लस द्या -
ज्यांना लसीकरण करण्यात येणार आहे, अशा व्यक्तींना लसीकरण झाल्याची खूण म्हणून मतदानानंतर ज्याप्रमाणे शाई लावली जाते, तशी शाई त्या व्यक्तीच्या बोटावर लावण्यात यावी, अशी विनंती केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे. त्यांनी त्याला परवानगी नाही दिली, तर राज्यशासन त्याची अमंलबजावणी करेल, अशी माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली. सध्या लसीकरणासाठी जे प्राधान्य गट ठरवून दिले आहेत, त्यांच्यानंतर जेव्हा सामान्यांना लसीकरण केले जाईल, त्यावळेस गरीब आणि दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना केंद्र शासनाने मोफत लस द्यावी, अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे करण्यात आल्याची माहितीही टोपे यांनी दिली. केंद्र शासनाकडून प्रत्यक्षात लसीकरणाची तारीख कळविल्यानंतर आणि लसीचा पुरवठा झाल्यानंतर राज्यात लसीकरण मोहिम कधी राबवायची याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेतील, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.