मुंबई Drugs Smuggling : वांद्रे युनिटच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकार्यांनी केलेल्या कारवाईत वडाळ्यासह शिवडी परिसरात तीन आरोपींना चरस तस्करीच्या गुन्ह्यांत अटक करण्यात आलीय. या तिघांकडून पोलीसांनी ४ किलो ७७६ ग्रॅम वजनाचा उच्च प्रतीचा चरसचा साठा जप्त केला असून त्याची किंमत तब्बल १ कोटी ४३ लाख रुपये असल्याचं पोलीसांनी सांगितलंय. शहानवाज शाबीर गफुर राजपूत, शरीफ शकील शेख आणि शोएब साबीर गफुर राजपूत अशी या तिघांची नावं असून अटकेनंतर तिघांनाही किल्ला न्यायालयानं सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय.
अंगझडतीत सापडला चरसचा साठा : वडाळा परिसरात वांद्रे युनिटचे अधिकारी गस्त घालत होते. यावेळी या पथकाला वडाळ्यातील चार रोड, उन्निथा इमारतीसमोरील वडाळा गेट क्रमांक चार बसस्टॉपजवळ दोन तरुण संशयास्पदरीत्या फिरताना दिसले. त्यामुळे त्यांना पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत पोलीसांना उच्च प्रतीचा चरसचा साठा सापडला. त्यांच्या चौकशीत शोएब राजपूत याचे नाव समोर आलं असून त्यानेच ते चरस त्यांना विक्रीसाठी दिलं होतं. त्यामुळं या पथकानं शिवडीतील कुसूमबाई यासीम चाळीत शोएबला अन्य चरसच्या साठ्यासह ताब्यात घेतलं. या दोन्ही कारवाईत पोलीसांनी सुमारे पावणेपाच किलोचा उच्च प्रतीचा चरसचा साठा तसंच तीन मोबाईल जप्त केले असून, आरोपींकडून १ कोटी ४३ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या तिघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातील तिन्ही आरोपींना अटक करुन किल्ला न्यायालयात हजर करण्यात आलं असता, न्यायालयानं त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय.