मुंबई- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मुंबईतील मुस्लीमबहुल ठिकाणी रमजानच्या महिन्यात नजर ठेवण्यात येणार आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. रमजानचा पवित्र महिना शनिवारपासून सुरू होत आहे. लॉकडाऊन मुस्लीम समाजाला सेहरी आणि इफ्तारच्या खरेदीसाठी कोणतीही सूट देण्यात आलेली नाही, असे मुंबई पोलिसांचे प्रवक्ते प्रणय अशोक यांनी सांगितले. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
रमजानच्या काळात लॉकडाऊनचे पालन करण्यासाठी पोलिसांनी सर्व प्रकारची तयारी केली आहे, असे परिमंडळ विभाग एकचे पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशानदार यांनी सांगितले. मुस्लीम बांधवांनी सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळावेत. कोणत्याही मशिदीमध्ये, इमारतीच्या टेरेसवर जमा होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. नियमांचा भंग होऊ नये म्हणून ड्रोनच्याद्वारे नजर ठेवण्यात येईल आणि नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे निशानदार यांनी माध्यमांना सांगितले.
कंटेन्टमेंट झोन आणि मुस्लीमबहुल परिसरात शासन, सामाजिक संघटना यांच्यावतीने अत्यावश्यक सेवा पोहोचवण्यासाठी व्यवस्था केली आहे. यामुळे जीवनाश्यवक वस्तूंचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहिल, यामुळे सेहरी आणि इफ्तारच्या खरेदीसाठी कोणालाही बाहेर पडण्याची गरज नाही, असे निशानदार म्हणाले.