मुंबई -वाहन चालवण्याचा शिकाऊ परवाना ( Learning License ) साठी फेसलेस सेवा सुरू केली आहे. या सेवेला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने परिवहन विभागासमोर एक मोठे संकट निर्माण झाले आहे. लर्निंग लायसन्सनंतर पक्का परवाना ( Driving License ) काढण्यासाठी मुंबईतील प्रत्येक आरटीओमध्ये दररोज हजारो चालक स्लॉट बुकिंगसाठी ( Slot For Driving License ) धडपडत आहेत. पुढील महिन्याभराचे स्लॉट बुक असल्याने लर्निंग लायसन्स काढलेल्या चालकांना पक्क्या लायसन्ससाठी किती वेळ प्रतीक्षा करावी लागणार, असा सवाल लर्निग लायसन्स धारकांकडून विचारला जात आहे.
हजारो चालकांची स्लॉट बुकिंगसाठी धडपडत-गेल्या काही महिन्यापूर्वी परिवहन विभागाने लर्निंग लायसन्ससाठी फेसलेस सेवा सुरू केली आहे. त्यामुळे आता लर्निंग लायसन्ससाठी वाहन चालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालया ( Regional Transport Office ) जाण्याची गरज नाही. फेसलेस सेवेच्या माध्यमातून अर्जदारांना घरीच लर्निंग लायसन्स चाचणी देणे शक्य झाले. मात्र, त्याचा विपरित परिणाम पक्का वाहन परवाना काढताना सहन करावा लागत आहे. लर्निंग लायसन्स काढण्याच्या संख्येवर परिवहन विभागाचे नियंत्रण नसल्याने एकाच दिवशी लाखो चालक लर्निंगसाठी अर्ज करत आहेत. लर्निंग लायसन्स काढल्याच्या एका महिन्यापासून सहा महिन्यांपर्यंतच्या अवधीत चालकांना परमनंट लायसन्स काढण्याची मुभा आहे. त्यामुळे आरटीओ कार्यकायात परमनंट लायसन्ससाठी मुंबईतील प्रत्येक आरटीओमध्ये दररोज हजारो चालक स्लॉट बुकिंगसाठी ( Slot Booking For DL ) धडपडत आहेत.