मुंबई - कोरोनाला हद्दपार करण्यासाठी वयोवृद्ध व दिव्यांग नागरिकांचे लसीकरण केंद्रावरील त्रास कमी करण्यासाठी आणि कोविडच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी नागरिकांचे जास्तीत जास्त लसीकरण करणे हाच मोठा उपाय आहे. वयोवृद्ध व दिव्यांग नागरिकांना लसीकरण केंद्रावरील होणाऱ्या दिरंगाईमुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना गाडीत बसून लस मिळण्यासाठी ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र मुंबईत ठिक-ठिकाणी महापालिका उभारत आहे. आज (दि. 19 मे) घाटकोपरच्या पोलीस मैदानाच्या स्पोर्ट कॉम्प्लेक्स जवळ आमदार शाह यांच्या प्रयत्नाने घाटकोपर विभागात पहिल्यांदाच ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र उभारण्यात आले त्या लसीकरण केंद्राचे उद्घाटन आज स्थानिक आमदार पराग शाह आणि खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते करण्यात आले.
मागील वर्षापासून जगभरात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. मात्र, भारताला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मृतांचे प्रमाण वाढले आहे. कोरोना विरुद्ध लढणाऱ्या डॉक्टरांनीही आपले जीव गमावले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी नागरिकांचे जास्तीत जास्त लसीकरण करणे हाच मोठा उपाय आहे. त्यामुळे मुंबई वयोवृद्ध आणि दिव्यांग नागरिकांसाठी ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र स्थानिक आमदार, खासदार आणि स्थानिक प्रशासन उभारत आहेत. जेणेकरून या केंद्रावर वृद्ध आणि दिव्यांग नागरिक येऊन लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करावे यासाठी या केंद्राची निर्मिती केली जात आहे.