मुंबई :मोठ्या व्यक्तींच्या भांडणात लहान माणसांचा बळी जातो असे म्हटले जाते. हा वाक्प्रचार सध्या राज्यात चांगलाच प्रत्ययास येतो आहे. राज्यातील बेघर आणि दुर्बल घटकातील लोकांना हक्काचे घर देण्यासाठी सुरू असलेल्या योजना श्रेय वादात अडकल्याने हजारो बेघर आपल्या हक्काच्या घरापासून वंचित आहेत. पंतप्रधान आवास योजना ( Pradhan Mantri Awas Yojana) ही देशातील सर्व बेघरांना हक्काचे घर देण्यासाठी 2015 पासून लागू करण्यात आली आहे. 2019 पर्यंत ही योजना अत्यंत वेगाने राज्यात सुरू होती कारण देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ती जोरदारपणे राबवली होती. मात्र त्यानंतर सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारच्या या योजनेला प्रतिसाद दिला तर त्याचे श्रेय केंद्राला आणि मोदींना जाईल, म्हणून ही योजना राबवण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची माहिती गृहनिर्माण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
महाविकास आघाडी सरकार : महाविकास आघाडी सरकारने या बदल्यात राज्यात मुख्यमंत्री आवास योजना लागू करण्याचा निर्णय घेतला पंतप्रधान आवास योजनेला मुख्यमंत्री आवास योजना ( CM Awas Yojana) ही समांतर योजना होती. या योजनेमुळे दुर्बल आणि गरीब घटकातील लोकांना त्यांची हक्काची घरेही मिळतील आणि राज्य सरकारलाही त्याचे श्रेय मिळेल अशी धारणा होती मात्र या योजनेची आखणी पूर्ण झाल्यानंतर ती प्रत्यक्षात अंमलबजावणीला येईपर्यंत राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यामुळे गेल्या अडीच वर्षात घरासाठी झटणाऱ्या नागरिकांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेची राज्यातील स्थिती? :राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेला गेल्या अडीच वर्षात अत्यंत संतगतीने काम सुरू होते. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मंजूर झालेल्या आठ लाख 12 हजार 923 घरांपैकी केवळ दोन लाख 96 हजार 327 घरे आतापर्यंत पूर्ण करण्यात आली आहेत. या घरांसाठी केंद्र सरकारचा 4439 कोटी रुपयांचा वाटा अपेक्षित असताना आतापर्यंत फक्त 1689 कोटी रुपये केंद्र सरकारकडून प्राप्त झाले आहे. केंद्राशी सातत्याने पाठपुरावा न केल्याने अद्यापही 2750 कोटी रुपये केंद्राकडून येणे बाकी असल्याने काम संथ गतीने सुरू आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागामार्फत या योजनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात ( Housing Department Neglect scheme ) आले. या योजनेसंदर्भात फारशा बैठका झाल्या नाहीत अथवा तिची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्नही केले गेले नाहीत. त्यामुळे या योजनेची स्थिती जैसे थे अशीच झाली. अशी माहिती या प्रकल्पावर काम करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.