मुंबई- नाले सफाईच्या कामांना महिना उलटून गेला तरीही सरासरी फक्त ३५ टक्के नालेसफाई झाली आहे. नालेसफाई योग्य प्रकारे झाली नसल्याने यंदा मुंबई थोड्या पावसातही तुंबेल अशी भीती व्यक्त करत विरोधकांसह सत्ताधा-यांनीही प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. यावर येत्या १३ मे ला नालेसफाईच्या कामांचा अहवाल सादर करण्याचे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले आहेत.
नालेसफाईचे काम यंदा दरवर्षीपेक्षा लवकर सुरू होऊनही अनेक ठिकाणी नाले गाळातच आहेत. ३५ ते ४० टक्के नालेसफाई झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, हा दावा खोटा असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्थायी समितीत नालेसफाईबाबतची वस्तूस्थिती हरकतीच्या मुद्द्याद्वारे मांडून प्रशासनाचे लक्ष वेधले. बहुतांशी ठिकाणी नाल्यांतील गाळ तसाच आहे. काही नाले डेब्रिजने भरलेले आहेत. महापौरांच्या वॉर्डातच नाले गाळांनी भरलेले आहेत. महिनाभर काम सुरू होऊनही नाल्यांची सफाई झालेली नसल्याने यंदा पहिल्या पावसातच मुंबई पाण्यात जाण्याची शक्यता असल्याची भिती त्यांनी व्यक्त केली. आचारसंहितेचे कारण सांगत प्रशासन कंत्राटदारांना वाचवत असल्याचा आरोपही रवी राजा यांनी केला.
मुंबईभर मेट्रोची कामे सुरू आहेत. पालिका अधिका-यांनी अशा कामांच्या भेट देऊन पाहणी करणे आवश्यक होते, मात्र अजूनही पाहणी झालेली नाही. ई वॅार्डमध्ये रस्ते, नाल्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. त्यामुळे येथे यंदाच्या पावसात ठिकठिकाणी पाणी भरणार असून त्याला प्रशासन जबाबदार असल्याचे सपाचे रईस शेख यांनी सांगितले. तर भाजप व शिवसेनेनेही नालेसफाईच्या कामांबाबत असमाधान व्यक्त केले. एफ नॅार्थमध्ये थोड्या पावसातही पाणी तुंबते. येथे अजूनही नालेसफाई झालेली नाही. काही ठिकाणी नाल्यातील काढलेला गाळ नाल्यांच्या बाजूला पडून असल्याने तो उचलला नाही, तर पुन्हा नाल्यात वाहून जाऊन हा परिसर जलमय होईल, अशी भीती भाजपच्या नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांनी व्यक्त केली. नालेसफाईच्या कामांशी आचारसंहितेशी काय संबंध असा प्रश्न विचारत २३ मे पर्यंत थांबलो तर नाल्यांची सफाई पावसापूर्वी कशी होणार याकडे भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी लक्ष वेधले.