मुंबई : सदिच्छा साने 22 ही वांद्रे बँड स्टँड येथून बेपत्ता झाल्यानंतर अंगरक्षक मिठू सिंग (32) याला गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने अटक केली. सदिच्छा अखेरची त्याच्यासोबत असल्याचे समोर आले. दक्षिण मुंबई येथील जे. जे. ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमध्ये सदिच्छा साने ही तिसऱ्या वर्षाला शिकत होती. २९ नोव्हेंबर २०२१ ला ती परीक्षेसाठी जाते म्हणून घरातून निघाली पण ती परतलीच नाही. सदिच्छाचा शोध कुठेच लागत नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार केली. यानंतर जे. जे. मार्ग पोलिसांनी देखील तिचा शोध घेतला. तिचा काहीच ठावठिकाणा लागत नसल्याने या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविेण्यात आला होता. तांत्रिक पुराव्यांवरून तिचे शेवटचे लोकेशन वांद्रे बँड स्टॅन्ड येत होते. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी वांद्रे पोलीस ठाण्यातही धाव घेतली होती.
१०० पेक्षा अधिक जणांची चौकशी : गुन्हे शाखेचा कक्ष ९ ने याबाबत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करतानाच पोलिसांनी १०० पेक्षा अधिक जणांची चौकशी देखील केली. सदिच्छाला शेवटचे अंगरक्षक मिठू सिंगने पाहिले होते. तिने याच्यासोबत सेल्फी देखील काढली होती. पोलिसांनी मिठू सिंगची चौकशी केली; मात्र तो चौकशीत सहकार्य करत नसल्याने पोलिसांना न्यायालयात त्याच्या नार्को चाचणीसाठी अर्ज केला होता. पोलिसांनी मिठू विरोधात पुरावे गोळा केले. परिस्थितीजन्य पुराव्यांवरून त्याला अटक करण्यात आली. चौकशीमध्ये मिथ्थु याच्यासोबत सदिच्छा असताना त्याने अब्दुलशी संपर्क केला आणि दोघांमध्ये फोनवरून चर्चा झाली. यामध्ये दोघेही सदिच्छा हिच्याबाबत आक्षेपार्ह आणि अश्लील बोलत असल्याचे तपासातून समोर आल्यानंतर पोलिसांनी शनिवारी अब्दुलला अटक केली.